बीजिंग : बॅडमिंटन इतिहासातील महान खेळाडूंमध्ये गणल्या जाणारा दोनवेळचा आॅलिम्पिक चॅम्पियन चीनच्या लिन डॅनने शनिवारी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली. यासह त्याने दोन दशकाच्या सुवर्णमय कारकिर्दीला पूर्णविराम दिला.सलग दोनदा आॅलिम्पिकमध्ये एकेरीचे जेतेपद पटकाविणारा एकमेव बॅडमिंटनपटू ‘सुपर डॅन’ने चीनमधील सोशल मीडियावर निवृत्तीची माहिती दिली.बीजिंग आॅलिम्पिक २००८ व लंडन आॅलिम्पिक २०१२ मध्ये सुवण पटकाविणारा ३६ वर्षीय डॅन म्हणाला, ‘२००० ते २०२० पर्यंत २० वर्षांनंतर मी राष्ट्रीय संघाचा निरोप घेत आहे. हे सांगणे कठीण आहे. या वयात शरीर व दुखापती मला पुढे खेळण्यास परवानगी देत नाही. आगामी काळात कुटुंबाला अधिक वेळ देता येईल.’डॅन पुढे म्हणाला, ‘चार आॅलिम्पिक खेळल्यानंतर मी या दिवसाबाबत कधी विचार केला नव्हता. मी कारकीर्द वाढविण्यासाठी प्रयत्न केले व शक्य तेवढी मेहनत केली, पण शेवटी कुठेतरी थांबावे लागतेच.’ कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात तो फॉर्मबाबत संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले.’ (वृत्तसंस्था)लिन डॅनने सुवर्णमय कारकिर्दीत दोन आॅलिम्पिक सुवर्णपदकांव्यतिरिक्त पाच विश्व चॅम्पियन जेतेपद आणि सहा आॅल इंग्लंड जेतेपदाचा समावेश आहे. त्याने एकेरीत ६६ जेतेपद पटकावले आहेत.
बॅडमिंटनपटू लिन डॅनची निवृत्ती, २० वर्षांच्या कारकिर्दीत एकेरीत पटकावले ६६ विजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 4:13 AM