गेल्या काही वर्षांपासून बॅडमिंटनमध्ये भारताने चांगलीच प्रगती केली आहे. सायना नेहवालच्या उदयानंतर पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, बी. साईप्रणीत यांसारख्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा अभिमानाने फडकावला. सायनानंतर आतंरराष्ट्रीय स्तरावरील चीनच्या वर्चस्वाला हादरे देण्याचे काम सिंधू आणि श्रीकांत यांनी चोखपणे बजावले. २०१७ मध्येही सायनासह या दोघांनी चीनसह, मलेशिया, कोरिया, डेन्मार्क यासारख्या बलाढ्य देशातील खेळाडूंना झुंजावले.>पी. व्ही. सिंधू हिने नवे कीर्तिमान प्राप्त केले; पण किदाम्बी श्रीकांत याने सर्वाधिक विजेतेपद मिळवत बॅडमिंटनला अधिक उंची गाठून दिली. ज्यामुळे हे सत्र पुरुष खेळाडूंसाठी यशस्वीपूर्ण ठरले. या वर्षी जगभरातील स्टेडियमवर अनेकवेळा भारताचे राष्ट्रगीत वाजताना दिसले, जी अभिमानाची बाब ठरली. कारण सिंधू आणि श्रीकांत यांनी एलिट बॅडमिंटन स्पर्धेच्या पोडियममध्ये जागा मिळवली. सिंधूने तीन विजेतेपदे आणि तीन रौप्यपदके पटकावत विश्वातील सर्वाेत्कृष्ट खेळाडूमध्ये स्थान मिळवले. दुसरीकडे, श्रीकांतने अपेक्षेहून अधिक चांगला खेळ करीत चार विजेतेपेदे आणि एक उपविजेतेपद पटकाविले.>२०१७ मध्ये पुरुष खेळाडू हे महिला खेळाडूंच्या तुलनेत आघाडीवर राहिले. ज्यामध्ये बी. साई प्रणीत आणि एच.एस. प्रणय यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळ केला. सायना नेहवालनेही जबरदस्त पुनरागमन केले. दुहेरीतही खेळाडूंनी छाप पाडली. तौफिक हिदायतला प्रशिक्षण दिलेल्या इंडोनेशियाच्या मुल्यो हंडोयो यांना भारताचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. गेल्या वर्षी गुडघ्याच्या दुखापतीमुळे चार महिने बाहेर राहिलेल्या २४ वर्षीय श्रीकांतने एप्रिलमध्ये सिंगापूर, इंडोनेशिया आणि आॅस्ट्रेलियामध्ये सलग तीन फायनलमध्ये जागा मिळवली. तो सिंगापूर फायनलमध्ये पराभूत झाला. मात्र, इंडोनेशिया आणि आस्ट्रेलियामध्ये जिंकत अव्वल १० मध्ये स्थान मिळवले. तो सर्वाधिक कमाई करणाºयांच्या यादीतही सामील झाला. श्रीकांत विश्व चॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. मात्र, आॅक्टोबरमध्ये सलग आठवड्यात डेन्मार्क आणि फ्रान्समध्ये किताब जिंकण्यात तो यशस्वी ठरला. जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानावर पोहचून श्रीकांतने दुबई फायनल्समध्ये जागामिळवली.>राष्ट्रीय चॅम्पियनशीपच्या फायनलपर्यंतच्या प्रवासादरम्यान श्रीकांतने बºयाच दुखापतींचा सामना केला. या दुखापतींमुळे तो दोन स्पर्धा खेळू शकला नाही. प्रणीत आणि प्रणय यांनीही प्रभावित केले. प्रणीतने सिंगापूर ओपन शिवाय आॅल इंडिया फायनलमध्ये श्रीकांतला पराभूत करीत सुपर सिरिज किताब जिंकला.>प्रणीतने सहा आठवड्यांनंतर थायलंड ग्रां प्री गोल्ड जेतेपद पटकावले. याचदरम्यान प्रणॉयने मलेशियाचा महान खेळाडू लीग चोंग आणि चीनचा लोंग यांना सलग दोन दिवस पराभूत करीत इंडोनेशिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. प्रणॉयने डेन्मार्क ओपनमध्येही चोंग वेईचा पराभव केला आणि करिअरमधील सर्वाेत्कृष्ट १० वे मानांकन प्राप्त केले.>सायनाने शानदार पुनरागमन करीत मलेशिया मास्टर्स ग्रां प्री गोल्ड जेतेपदावर नाव कोरले. त्यानंतर विश्व चॅम्पियनशीपमध्ये कांस्यपदकही पटकाविले. त्याचवेळी सायनाने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूचा पराभव करुन जेतेपदाला गवसणी घातली.>युवा खेळाडूंमध्ये १६ वर्षीय लक्ष्य सेनने इंडिया इंटरनॅशनल सीरीज आणि युरेशिया बल्गेरीया ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावत स्वत:ला सिद्ध केले. यानंतर मुंबईत झालेल्या इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेत तो उपविजेताही ठरला.>आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. मात्र त्याचवेळी, जागतिक ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेसाठी संघात त्यांची मुलगी गायत्री हीच्या झालेल्या निवडीवर मोठा वादही उपस्थित झाला होता.
#BestOf2017: बॅडमिंटनमध्ये या खेळाडूंनी गाजवले वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:00 AM