नवी दिल्ली : आम्हाला सातत्याने मदत केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. भारतीय खेळाडूंनी जर स्वत:च्या क्षमतेवर विश्वास कायम ठेवला, तर नक्कीच त्यांना चीन, कोरिया आणि जपान या देशांतील खेळाडूंवर दबदबा राखण्यात यश येईल,’ असे मत भारताचे स्टार शटलर सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी व्यक्त केले.केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या निवासस्थानी झालेल्या एका समारंभामध्ये या दोन्ही खेळाडूंनी मत व्यक्त केले. नुकताच झालेल्या ग्लासगो जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर सायनाने कांस्यपदक मिळवले. या दोघींमुळे स्पर्धेत भारताला दोन पदके पटकावता आली.सायनाने या वेळी म्हटले की, ‘सातत्याने मिळालेल्या पाठिंब्यासाठी आम्ही भारतीय सरकार आणि क्रीडामंत्र्यांचे आभार मानतो. सरकारने घेतलेल्या पुढाकारामुळेच विविध खेळ भारतात लोकप्रिय होत आहेत. आज देशात क्रीडा सुविधांमध्ये खूप सुधारणा होत असून, खेळाडूंनी स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. या जोरावरच आपण अधिक मजबूत बनू शकतो आणि चीन, जपान, कोरियासारख्या बलाढ्य संघांवर वर्चस्व गाजवू शकतो.’त्याचप्रमाणे, ‘भारतात बॅडमिंटनच्या लोकप्रियतेमध्ये खूप वाढ झाली आहे. अनेक उदयोन्मुख खेळाडू पुढे येत आहेत. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत रोमांचक झाला आणि हा सामना माझ्या कारकिर्दीतील सर्वांत लांबलचक सामना ठरला,’ असे सिंधूने या वेळी म्हटले.या वेळी, किदाम्बी श्रीकांतही उपस्थित होता. ‘खेळाडूंना देशात सन्मान मिळणे आवश्यक आहे,’ असे मत त्याने या वेळी मांडले. तसेच, राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद आणि सायनाचे वैयक्तिक प्रशिक्षक विमल कुमार हेही या वेळी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकणे विशेष: सायना नेहवालदेशातील अव्वल बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिने दुखापतीतून सावरल्यानंतर ग्लास्गो विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणे हे आपल्यासाठी विशेष ठरल्याचे म्हटले आहे.सायना म्हणाली, ‘पदक जिंकणे नेहमीच विशेष आहे. जर हे पदक आॅलिम्पिक अथवा विश्व चॅम्पियनशिपमधील असेल, तर ते खूपच विशेष असते. २0१५ मध्ये रौप्य आणि २0१७ मध्ये कांस्यपदक जिंकल्याने मी खूप सुदैवी आहे.’रिओ आॅलिम्पिकनंतर गुडघ्यावर शस्त्रक्रिया झालेली ही २७ वर्षीय खेळाडू म्हणाली, ‘माझ्यासाठी हे पदक खूप महत्त्वाचे आहे. कारण मला अशी दुखापत झाली होती की, ज्यामुळे माझ्या कारकिर्दीवर त्याचा परिणाम होऊ शकला असता.’ तिने फिजियो आणि प्रशिक्षक विमल कुमार यांची प्रशंसा केली. त्यांच्या मदतीने ती कोर्टवर पुनरागमन करू शकली.सायना म्हणाली, ‘गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर फिजियो चंदन पोद्दार आणि अरविंद निगम यानी मला मदत केली. त्यानंतर माझे प्रशिक्षक विमल यांनी हळूहळू जेथे मी आता आहे तेथे पोहोचवण्यास मदत केली.’ पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही गेल्यावर्षी चायना ओपनमध्ये सायनाला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. ती म्हणाली, ‘मी चीनमधील स्पर्धेत सहभाग घेतला आणि पहिल्याच फेरीत पराभूत झाली; परंतु मी एका आठवड्यानंतर मुसंडी मारत मकाऊ ओपन आणि हाँगकाँग ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. मी मलेशिया ओपन जिंकली आणि इंडिया ओपन, इंडोनेशिया ओपन तसेच आॅस्ट्रेलिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. आता विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणे खूप समाधानकारक राहिले.’लंडन आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणाºया या खेळाडूने म्हटले, ‘मी ग्लास्गोमध्ये पदक जिंकण्याविषयी आश्वस्त होती. सुंग जी ह्यूूनविरुद्ध माझा रेकॉर्ड ७-२ आहे. स्थानिक खेळाडू क्रिस्ट गिलमोरला उपांत्यपूर्व फेरीत नमवल्यानंतर मला ओकुहारा हिच्याविरुद्धच्या उपांत्यफेरीआधी विश्रांती मिळाली असती तर मी तिला पराभूत करू शकली असते. तीन सेटपर्यंत चाललेल्या या सामन्यात कमी विश्रांती मिळाल्यामुळे मला पराभवाचा सामना करावा लागला; परंतु मी पदक जिंकल्याने आनंदित आहे.’
...तर नक्कीच बलाढ्य संघांवर वर्चस्व गाजवू - सिंधू, सायना व्यक्त केले मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 3:59 AM