चांगजू: अश्विनी पोनप्पा-सात्त्विक साईराज रंकीरेड्डी यांच्या जोडीने चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी इंग्लंडचे मार्कस् इलिस आणि लॉरेन स्मिथ यांचा दणदणीत पराभव करीत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. सातवा मानांकित किदाम्बी श्रीकांत हा देखील उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला.अश्विनी-सात्त्विक यांचा याआधी दोनदा मार्कस्-लॉरेन यांच्याकडून पराभव झाला होता. जागतिक क्रमवारीत २५ व्या स्थानावर असलेल्या भारताच्या जोडीने डावपेचांची योग्य सांगड घालून राष्टÑकुल स्पर्धेच्या रौप्य विजेत्या प्रतिस्पर्धी जोडीचा एक तास तीन मिनिटांत २१-१३, २०-२२,२१-१७ अशा फरकाने पराभव केला.दुसरीकडे, मागच्या आठवड्यात जपान ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या श्रीकांतने बुधवारी डेन्मार्कचा रासमस गेमके याच्यावर २१-९, २१-९ ने सहज विजय नोंदविला. त्याची पुढची लढत आता थायलंडचा सुपानयू अविहिगसानोनविरुद्ध होईल.राष्टÑकुल स्पर्धेत पुरुष दुहेरीचे रौप्य विजेते सात्त्विक-चिराग शेट्टी या जोडीला मात्र मलेशियाचे गोह शेम आणि टॉन कियोनग यांच्याकडून १९-२१, २०-२२ ने पराभवाचे तोंड पहावे लागले. राष्टÑकुलचे कांस्य विजेते पोनप्पा-सिक्की रेड्डी ही भारताची महिला जोडी कोरियाची किम यियोंग-कोंग योंग यांच्याकडून १०-२१, १८-२१ ने पराभूत झाली. (वृत्तसंस्था)
चायना ओपन बॅडमिंटन: अश्विनी-सात्त्विकसह श्रीकांतची विजयी कूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 00:13 IST