चांगझू : भारताच्या पी. व्ही. सिंधूने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिला या विजयासाठी जागतिक क्रमवारीत 24 व्या स्थानावर असलेल्या बुसानन ओंगबॅमरूंगफानकडून कडवी टक्कर मिळाली. तिसऱ्या मानांकित सिंधूने अटीतटीच्या या सामन्यात 21-23, 21-13, 21-18 असा विजय मिळवला. तिला 69 मिनिटे संघर्ष करावा लागला.
पहिल्या गेमपासूनच या दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. बुसाननने जोरदार स्मॅश लगावताना 23-21 असा हा गेम घेत सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने 8-1 अशी आघाडी घेत चांगली सुरुवात केली. तिने ही आघाडी अखेरीस 21-13 अशी वाढवून सामन्यात पुनरागमन केले.
तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात दोन्ही खेळाडूंनी समसमान खेळ केला. दोघीही हार मानण्यास तयार नव्हत्या. सिंधूने पाच सलग गुणांची कमाई करताना 15-10 अशी आघाडी घेतली. मात्र, थायलंडच्या खेळाडूने संघर्ष करताना गेम 17-17 असा बरोबरीत आणला. त्यानंतर सिंधूने सलग चार गुण घेत हा गेम 21-18 असा जिंकून उपांत्यपूर्व फेरीत कूच केली.