नवी दिल्ली - ‘सध्याच्या खेळाडूंना पायाभूत क्रीडा सुविधांबाबत फारशी चणचण सहन करावी लागत नाही. आमच्यावेळी लहान- लहान सोईंसाठी अक्षरश: भटकंती करावी लागायची,’ असे मत राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे.आंध्र शासनाकडून येथे आयोजित कार्यशाळेत बोलताना गोपीचंद म्हणाले, ‘मी माझ्या करिअरमध्ये खेळाच्या पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करीत राहिलो. आजच्या पिढीला हा त्रास सहन करावा लागला नाही याचा आनंद आहे. खेळांमध्ये आजच्या घडीला फार उज्ज्वल भविष्य आहे. आजच्या मुलांमध्ये प्रतिभा आणि जाणीव आहे. त्यांना केवळ शिस्तीचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. यासाठी खेळ हे सर्वांत प्रभावी माध्यम आहे. उत्कृष्ट पायाभूत सुविधा उपलब्ध असतील तर खेळाडूंची भरभराट होणारच. देशात विश्व दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतील तर देशाचा सन्मान सर्वत्र वाढतच राहणार, यात शंका नाही.’यावेळी आंध्र शासनाने राज्याची राजधानी अमरावती शहरात आॅलिम्पिकचे आयोजन करण्यासारख्या अत्याधुनिक क्रीडा सुविधा उभारण्याची घोषणा केली. ही स्पोर्टस्सिटी २०३१ पर्यंत पूर्ण होईल.आम्हाला केवळ चॅम्पियन बनविण्याची नव्हे तर सर्व वयोगटातील लोकांना खेळ खेळता येईल, अशी क्रीडा संस्कृती रुजविण्याची गरज आहे. खेळाच्या माध्यमातून आयुष्यमान उंचावणे शक्य होत असल्याने निराशा झटकून सुजाण नागरिक घडविता येईल, अशी मला आशा आहे.- पुलेला गोपीचंद
पायाभूत क्रीडा सुविधांबाबत सध्याची पिढी ‘सुदैवी’ - गोपीचंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 4:23 AM