फुजोऊ - भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला शुक्रवारी चायन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या आणि गतविजेत्या सिंधूला चीनच्या गाओ फांगजीने 11-21, 10-21 असा सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. सिंधूच्या पराभवसह भारताचे चायन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवणारी सिंधू शेवटची स्पर्धक होती.
फांगजीचे फटके आणि तिच्या गतीमान खेळासमोर सिंधू पूर्णपणे निष्प्रभ ठरली. महिला एकेरीमध्ये फांगजी 89 व्या स्थानावर आहे. पहिल्या गेममध्ये फांगजीने सलग सात गुण घेत 14-11 अशी आघाडी घेतली. जी शेवटपर्यंत तिने टिकवली. दुस-या गेममध्ये फांगजीने खेळावरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही. तिने 21-10सह दुसरा गेम जिंकला. बॅडमिंटन कोर्टवरील त्यांचा हा पहिलाच सामना होता.
सायना व प्रणय यांच्यासाठी कालचा दिवस निराशाजनक ठरला. या दोघांनी या महिन्यात नागपुरात खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावले होते. सायनाला पाचव्या मानांकित जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध २१-१८, २१-११ ने पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असलेल्या प्रणयला ५३ व्या मानांकित हाँगकाँगच्या चियुक यिऊ लीविरुद्ध १९-२१, १७-२१ ने धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.
सायनासाठी ही लढत आव्हानात्मक होती. कारण जपानच्या या खेळाडूविरुद्ध सायनाची कामगिरी चांगली नाही. या लढतीपूर्वी उभय खेळाडूंदरम्यान खेळल्या गेलेल्या तीन लढतींमध्ये यामागुचीने सरशी साधली. सायनाला या खेळाडूविरुद्ध चौथ्यांदा पराभव स्वीकारावा लागला.