डेन्मार्क : ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यावर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची मदार असणार आहे. या स्पर्धेत सिंधूला तिसरे, तर सायनाला बिगरमानांकन देण्यात आले आहे. सिंधूला पहिल्याच फेरीत अमेरिकेच्या बैवेन झँगचा सामना करावा लागेल. सायनासमोर हाँगकाँगच्या चेयूंग नॅगेन यी हिचे आव्हान असणार आहे.
पुरूष एकेरीत जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या किदम्बी श्रीकांतला सातवे मानांकन देण्यात आले आहे. त्याला पहिल्याच फेरीत डेन्मार्कच्या हँस-क्रिस्टन सोलबर्गचाय सामना करावा लागेल. बी. साई प्रणितसमोर चीनच्या ह्युआंग युक्सियांगचे आव्हान असणार आहे. समीर वर्माला खडतर आव्हानाचा सामना करावा लागेल. त्याच्यासमोर चीनच्या शी युकीचे आव्हान असणार आहे. एच एस प्रणॉलाही सहाव्या मानांकित सोन वॅन होचा सामना करावा लागेल.
राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्या पारुपल्ली कश्यपला पासपोर्ट हरवल्यामुळे या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. पुरुष दुहेरीत मनू अत्री व बी. सुमिथ रेड्डी यांना स्थानिक खेळाडू किम अॅस्ट्रप व अँडर्स स्कारुप रास्मुसेनचा सामना करावा लागेल. अश्विनी पोनप्पा व सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांच्यासमोर मिश्र दुहेरीत कोरियाच्या सेओ सेयूंग जे आमि चाय युजूंग याचे आव्हान आहे.