नवी दिल्ली - दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये पी.व्ही.सिंधूचा पराभव झाला असला तरी सिंधू तब्येत बरी नसताना अंतिम फेरीचा सामना खेळत होती. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान सिंधू आजारी होती. ती सर्दीने हैराण झाली होती. पण तरीही तिने अंतिम फेरीत उत्तम लढत दिली असे सिंधूचे प्रशिक्षक पुललेला गोपीचंद यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना गोपीचंद यांनी प्रशिक्षणातील आव्हाने आणि सिंधूची 2018 बॅडमिंटन मोसमासाठी कशी तयारी आहे त्याची माहिती दिली.
दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या अकाने यामागुचीनं सिंधूचा तीन गेममध्ये 1-2 अशा फरकानं पराभव केला. अकाने यामागुचीनं जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर आहे. पहिला सेट जिंकल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये यामागुचीच्या आक्रमक खेळीपुढे सिंधूचा पराभव झाला. यामागुचीनं 21-15, 12-21, 21-19 असा सिंधूचा पराभव करत चषकावर नाव कोरलं.
जिंकण्यासाठी तुम्हाला शेवटचा पराभव विसरुन वेगाने पुढे जावं लागतं असे गोपीचंद म्हणाले. प्रशिक्षक म्हणून काम करताना खेळाडू त्याच्या पराभवावर जास्त विचार करणार नाही याकडे तुमचे लक्ष असले पाहिजे. खेळाडूला पुढच्या लढतीसाठी मानसिक दृष्टया तयार ठेवण्याची जबाबदारी आव्हानात्मक असते. पराभवातून पुन्हा उभे राहण्यासाठी खेळाडूला मदत करण्याची प्रशिक्षक म्हणून माझी जबाबदारी आहे असे गोपीचंद म्हणाले.
बॅडमिंटन वेळापत्रक व्यस्त; पण पर्याय नाहीभारतीय खेळाडू व्यस्त वेळापत्रकाचा सातत्याने सामना करीत असल्याची कबुली देत राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांनी व्यस्त वेळापत्रकाशी ताळमेळ साधण्याशिवाय खेळाडूंपुढे पर्याय नसल्याचे म्हटले आहे. भारतीय खेळाडू गरजेपेक्षा अधिक स्पर्धा खेळत असल्याचे विधान दिग्गज खेळाडू प्रकाश पदुकोण यांनी नुकतेच केले. त्यांच्या वक्तव्यानंतर देशात बॅडमिंटनपटूंच्या व्यस्त वेळापत्रकाचीच चर्चा सुरू झाली. एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद म्हणाले,‘व्यस्त वेळापत्रकाचा फटका केवळ भारतीय खेळाडूंनाच नव्हे तर जगातील खेळाडूंना बसतो आहे. महत्त्वपूर्ण असलेल्या आशियाई आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांमध्ये खेळणे गरजेचे असल्यामुळे भारतीय खेळाडूंसाठी पाठोपाठ स्पर्धा खेळणे ही मोठी डोकेदुखी ठरत आहे.’
युरोपातील खेळाडू राष्ट्रकुल किंवा आशियाई खेळात खेळत नाहीत पण आमच्या खेळाडूंपुढे पर्याय नाही. आमच्या खेळाडूंना परिस्थितीशी ताळमेळ साधावाच लागेल. प्रवास करताना देखील सरावाकडे पाठ फिरवून चालणार नाही.’ भारताच्या अव्वल खेळाडूंना विश्रांती देत राष्ट्रकुलमध्ये दुय्यम दर्जाचा संघ पाठविणे योग्य राहील का, असा सवाल करताच गोपीचंद म्हणाले, ‘नाही. राष्ट्रकुल ही महत्त्वाची स्पर्धा असल्याने आम्हाला दुय्यम दर्जाचे खेळाडू पाठविता येणार नाही.