नानिंग : दहावेळेचा चॅम्पियन असलेल्या बलाढ्य चीनने दुसऱ्या आणि अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाला ५-० असे सहजपणे नमवले. या दारुण पराभवासह भारतीयांचे सुदीरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आले. ग्रूप वन डीच्या पहिल्या सामन्यात भारताचा मलेशियाने ३-२ ने पराभव केला होता. भारताला स्पर्धेत कायम राहण्यासाठी चीनविरुद्ध मोठ्या विजयाचा चमत्कार करण्याची गरज होती. मात्र भारतीय खेळाडू अपेक्षित खेळ करु शकले नाहीत.
मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी यांची जोडी चीनचे वांग यिल्यू हुआंग डोंगपिंग यांच्याकडून ५-२१, ११-२१ ने पराभूत झाली. मलेशियाचा ली झिया याच्याविरुद्ध एकेरीत पराभूत झालेला समीर वर्मा किदाम्बी श्रीकांत जखमी असल्याने पुन्हा एकदा कोर्टवर उतरला खरा पण १ तास ११ मिनिटांच्या लढतीत तो आॅलिम्पिक चॅम्पियन चेन लोंग याच्याकडून १७-२१, २०-२२ ने पराभूत झाला.
सात्त्विक साईराज रंकिरेड्डी व चिराग शेट्टी यांचा जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या हान चेंगकाय- झोऊ हाओडोंग यांच्याकडून २१-१८, १५-२१, १७-२१ असा पराभव झाला. भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालला आॅल इंग्लंड चॅम्पियन चेन यूझेईने ३३ मिनिटांत १२-२१, १७-२१ ने नमविले. जागतिक क्रमवारीतील तिसरी चिनी जोडी चेन किंगचेन- झिया यिफेन यांनी अश्विनी पोनप्पा- सिक्की रेड्डी यांचा २१-१२, २१-१५ असा पराभव केला. (वृत्तसंस्था)