क्वालालम्पूर : मलेशियाचा माजी नंबर वन बॅडमिंटनपटू ली चोंग वेई याने कॅन्सरवर यशस्वी मात केली असून आता तो कोर्टवर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. पुढील १५ दिवसांत तो सराव करताना दिसेल, अशी माहिती लीच्या निकटवर्तीयांनी दिली. तीनवेळचा आॅलिम्पिक रौप्यविजेता ली जवळपास पाच महिने कोर्टबाहेर होता. त्याने तंदुरुस्तीवर सध्या भर देत सारावाला सुरुवात केली असून डॉक्टरांनीही त्याला तंदुरुस्त घोषित केले. मलेशियाच्या बॅडमिंटन संघटनेचे प्रमुख नोर्जा जकारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ली आनंदी आहे. दोन आठवड्यात तो नियमितपणे सराव सुरू करेल. आॅलिम्पिक पात्रता फेरीपर्यंत तो पूर्णपणे सज्ज होईल,’ असा विश्वास आहे.चोंग वेईने आपल्या पुनरागमनाविषयी सांगितले की, ‘नाकाच्या कॅन्सरवरील यशस्वी उपचारानंतर मी बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन करण्याच्या योजना आखत आहे. सध्या तरी बॅडमिंटनमधून निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही.’ पुढील वर्षी होणाऱ्या सर्वात प्रतिष्ठेच्या आॅल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेतून ली आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुनरागमन करु शकतो अशी चर्चा आहे.आतापर्यंत तीनवेळा आॅलिम्पिक रौप्य पदक पटकावलेला ली आगामी टोकियो २०२० आॅलिम्पिक स्पर्धेमध्येही सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे. ही आॅलिम्पिक स्पर्धा त्याच्या कारकिर्दीतील पाचवी आॅलिम्पिक स्पर्धा ठरेल हे विशेष. त्याचवेळी, ‘आॅलिम्पिक स्पर्धेची पात्रता गाठण्यासाठी मला कोणतीही अडचण येणार नाही. मात्र असे असले तरी, शारीरिक प्रकृतीसाठी माझे प्रथम प्राधान्य असेल,’ असेही ली चोंग वेई याने यावेळी म्हटले. (वृत्तसंस्था)
कॅन्सरवर मात करीत ली पुनरागमनास सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 4:31 AM