नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने सोनेरी कामगिरी केली आहे. लक्ष्यने आशियाई कनिष्ट अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत थायलंडच्या कुनलावुत वितिदसरनवर 21-19, 21-18 असा विजय मिळवला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा लक्ष्य हा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे.
या स्पर्धेत जवळपास 53 वर्षांपूर्वी म्हणजेच 1965 साली गौतम ठक्कर यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. त्यानंतर 2012 साली भारताच्या पी. व्ही. सिंधूने या स्पर्धेत अव्वल कामगिरी केली होती. ही स्पर्धा जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला ठरली होती.
थायलंडच्या कुनलावुतने लक्ष्यला चांगली लढत दिली, पण त्याला एकही गेम जिंकता आला नाही. लक्ष्यने निर्णायक क्षणी आपल्या खेळात चांगला बदल केला. दोन्ही गेम्सच्या अखेरच्या क्षणांमध्ये लक्ष्यने जोरदार आक्रमण केले.