नागपूर : पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप, सायना नेहवालसह अन्य बॅडमिंटनपटूंची आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी चमकदार होत आहे. त्यामुळे भारतीय बॅडमिंटनचा हा सुवर्णकाळ आहे, असे मत माजी आॅल इंग्लंडविजेते बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले. एसजेएएनतर्फे रविवारी आयोजित ‘मिट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते.१९७२ मध्ये अर्जुन, तर १९८२ मध्ये पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरलेले पदुकोण म्हणाले, ‘सध्या भारतीय खेळाडूंची कामगिरी बघता हा भारतीय बॅडमिंटनचा सुवर्णकाळ आहे. युवा प्रतिभावान खेळाडू पुुढे येत आहेत. सब-ज्युनिअर पातळीवरही प्रतिभावान खेळाडू आहेत.’नागपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या ८२ व्या सिनिअर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत आघाडीचे खेळाडू सहभागी झाले आहेत. त्याबाबत बोलताना पदुकोण म्हणाले, ‘बॅडमिंटनसाठी हे शुभसंकेत आहेत. कारण खेळ लोकप्रिय करण्याची जबाबदारी आघाडीच्या खेळाडूंवर आहे. माझे वैयक्तिक मत विचारात घेतले तर राष्ट्रीय स्पर्धेत आघाडीच्या खेळाडूंचा सहभाग असायलाच हवा आणि भविष्यातही अव्वल खेळाडूंचा सहभाग कायम राहावा, असे वाटते.’ दुहेरीतील कामगिरीबाबत विचारले असता पदुकोण म्हणाले, ‘एकेरीच्या तुलनेत दुहेरीमध्ये आपली वाटचाल थोडी संथ आहे, पण योग्य दिशेने सुरू आहे.’
भारतीय बॅडमिंटनचा सुवर्णकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:04 AM