हाँगकाँग : संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने हाँगकाँग ओपन सुपरसीरिज स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू चिनी तैपईच्या ताइ जु यिंग हिने सिंधूचा पराभव करत सुवर्ण पटकावले. विशेष म्हणजे सिंधूला सलग दुसºयांदा यिंगविरुद्ध पराभूत व्हावे लागले.सलग पाचवी स्पर्धा खेळत असलेल्या सिंधूने जबरदस्त प्रदर्शन केले. पण, अंतिम सामन्यात मोक्याच्या वेळी झालेल्या चुका महागात पडल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ४४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या लढतीत यिंगविरुद्ध सिंधू १८-२१, १८-२१ अशी पराभूत झाली. या सामन्याआधी सिंधू - यिंग यांच्या लढतीतील रेकॉर्ड ३-७ असा होता. यंदाच्या मोसमात सिंधूने चार अंतिम लढती खेळल्या असून, त्यापैकी दोन लढती तिने जिंकल्या असून दोन लढती गमावल्या आहेत.पहिल्या गेममध्ये झुंजार खेळ करत पिछाडीवरून आघाडी घेतल्यानंतरही सिंधूला यिंगच्या आक्रमकतेपुढे पराभूत व्हावे लागले. यानंतर दुसºया गेममध्ये दोघींनीही तोडीस तोड खेळ केला खरा; पण पुन्हा एकदा आघाडी घेतल्यानंतर सिंधूने दबावाखाली येत काही चुका केल्या. या चुकांचा पुरेपूर फायदा घेत यिंगने शानदार विजयासह सुवर्ण पटकावले. (वृत्तसंस्था)
हाँगकाँग ओपन : सिंधूचे रौप्य पदकावर समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 1:16 AM