हाँगकाँग- भारताची स्टार बॅडमिंटन प्लेअर पी.व्ही सिंधूने हाँगकाँग ओपन सुपर सीरिजच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी हाँगकाँगमध्ये झालेल्या सेमीफायनलमध्ये सिंधूने थायलंडच्या रतचानोक इंतानोनचा पराभव केला. 43 मिनिट चाललेल्या या सामन्यात सिंधूने रतचानोक इंतानोनचा 21-17, 21-17 ने पराभव केला. हाँगकाँग सुपर सिरिजच्या फायनलमध्ये धडक मारण्याचं सिंधूचं हे सलगचं दुसरं वर्ष आहे.
रविवारी हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटनची फायनल मॅच रंगणार आहे.अंतिम फेरीत सिंधूसमोर चायनिज तैपईच्या ताई त्झू-यिंग हिचं आव्हान आहे. ताई त्झू-यिंगने सेमीफायनल मॅचमध्ये कोरियाच्या सुंग-जी-ह्यूनचा 21-9, 18-21, 21-7 ने पराभव केला. गेल्यावर्षीसुद्धा सिंधूचा फायनल मॅचमध्ये ताई त्झू-यिंगनेशी मुकाबला झाला होता. त्या सामन्यात सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे रविवारी होणाऱ्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
शनिवारी झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये सिंधूने सुरूवातीलाच तीन गुणांनी आघाडी घेतली होती. ब्रेकपर्यंत सिंधूने ही आघाडी कायम ठेवली. ब्रेकपर्यंत 11-7 असे गुण होते. त्यानंतर सिंधून स्ट्रोक्स आणि खेळात तेजी आणत 14-7 असे गुण केले. मॅचमध्ये 20-13 असा स्कोअर झाल्यावर सिंधू विजयाच्या जवळ असताना इंतानोनचाने लागोपाठ चार गुण मिळवत खेळात परतण्याचा प्रयत्न केला. पण तिचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि सिंधूचा 21-17 ने विजय झाला.
दुसऱ्या डावात सिंधूचा खेळ आणखी सुधारलेला पाहायला मिळाला.दोन्ही खेळाडुंनी या डावात एकमेकींना कडवी टक्कर दिली. इंतानोनने खेळाच्या सुरूवातीला 6-5 ने आघाडी घेतली. पण सिंधूने उत्कृष्ट खेळी करत लागोपाठ सहा गुण मिळविले आणि ब्रेकपर्यंत 11-6 ने आघाडी घेतली. पण इंतानोनने हार न मानता गुणांमधील अंतर कमी करण्याचे प्रयत्न केले. सिंधू जेव्हा 18-14 ने पुढे होती तेव्हा इंतानोनने सलग दोन गुण मिळवत स्कोअर 16-18 केला. पण सिंधूने तिच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर 21-17 ने सेमीफायनलची मॅच तिच्या नावे केली.