नवी दिल्ली :‘ मी टीकेला बाघरत नाही. टीका किंवा अपेक्षांचे ओझे माझ्या वाटचालीत अडसर ठरणार नाहीत. यंदा टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी स्वत:चा खेळ सुधारण्यावर भर देत आहे,’ असे माजी विश्वविजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने बुधवारी स्पष्ट केले. सिंधूने २०१९ मध्ये विश्व विजेतेपदाचा किताब जिंकला. मात्र त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये सिंधू सुरुवातीचा अडथळा पार करू शकली नव्हती. मागच्या महिन्यात झालेल्या विश्व टूर फायनल्समध्येही सिंधू जेतेपदाचा बचाव करण्यात अपयशी ठरली होती.वृत्तसंस्थेशी बोलताना रियो आॅलिम्पिकची रौप्य विजेती सिंधू म्हणाली,‘जागतिक अजिंक्यपद माझ्यासाठी शानदार ठरली. यानंतर मी पहिल्या फेरीत पराभूत होत गेले. पराभवानंतरही मी सकारात्मक राहीले. सर्वच सामने जिंकणे शक्य नाही. काही वेळा तुम्ही उत्कृष्ट खेळता पण काही वेळा चुकाही होतातच. मी चुकांमधून मोठा बोध घेतला असून माझ्यासाठी सकारात्मकभाव बाळगून दमदार पुनरागमन महत्त्वाचे आहे.’खेळातील उणिवा दूर करण्यासाठी तांत्रिक बारकाव्यांवर भर देत असल्याचे सांगून सिंधू म्हणाली, ‘दडपण व टीकांमुळे माझ्या खेळावर परिणाम होत नाही. चाहते माझ्याकडून नेहमी विजयाची आशा बाळगतात. आॅलिम्पिक पदक हे सर्वच खेळाडूंसाठी अंतिम लक्ष्य असते.’आॅलिम्पिक पदकाबाबत सिंधू म्हणाली, ‘मी तंत्र आणि कौशल्यावर अधिक भर देत आहे. सर्व काही सुरळीत होऊन आॅलिम्पिकपर्यंत पुन्हा माझा खेळ बहरेल. टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात यश नक्की येईल. मी एकेक पाऊल टाकण्याचे लक्ष्य आखते.’‘यंदाच्या मोसमाची सुरुवात जानेवारीत मलेशिया व इंडोनेशिया ओपन स्पर्धेद्वारे होईल. याशिवाय आॅलिम्पिक पात्रता फेरीसाठी काही स्पर्धा होतील. यादृष्टीने भारतीयांसाठी सर्वच स्पर्धा महत्त्वाच्या असतील,’ असेही सिंधू म्हणाली.
मी टीकेला घाबरत नाही - पी. व्ही. सिंधू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 2:11 AM