गोल्ड कोस्ट :राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सायना नेहवाल ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाली आहे. पण सामना खेळण्यापूर्वीच सायना हताश झालेली पाहायला मिळाली. सायनाला कोणतीही दुखापत वगैरे नक्कीच झालेली नाही, तिचा सरावही चांगला सुरु आहे. पण तरीदेखील स्पर्धा सुरु होण्यापूर्वी सायना हताश झालेली पाहायला मिळाली.
सायनाने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्याचबरोबर २०१० साली नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सायनाने सुवर्णपदक पटकावले होते. २०१४ साली ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सायनाला दुखापतीमुळे सहभागी होता आले नव्हते.
सायनाने भारतीय संघांतील अधिकाऱ्यांमध्ये आपल्या वडिलांचे नाव दिले होते. पण सायनाचे वडिल हरवीर यांचे नाव या यादीतून काढून टाकण्यात आले. या निर्णयामुळे सायना हताश झाली आहे.
याबाबत सानया म्हणाली की, “ माझ्यासाठी वडिलांचा पाठिंबा फार महत्वाचा आहे. प्रत्येक स्पर्धेत ते माझ्याबरोबर असतात आणि मला पाठिंबा देतात. ते स्पर्धेला असले की मला दिलासा मिळतो. पण भारतीय अधिकाऱ्यांच्या यादीतून त्यांचे नाव का काढण्यात आले, हे मला माहिती नाही. भारतातून निघताना माझ्या बाबांचे नाव यादीत होते, पण आता का नाही, हे मला समजलेले नाही. “