हैदराबाद - आगामी आॅल इंग्लंड स्पर्धेत कुणी भारतीय खेळाडू जेतेपद पटकावत १८ वर्षांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणेल, अशी आशा भारतीय बॅडमिंटनचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केली.गोपीचंद या स्पर्धेत जेतेपद पटकाविणारे अखेरचे भारतीय खेळाडू होते. त्यांनी हा पराक्रम २००१ मध्ये केला होता.ते म्हणाले, यंदा मार्चमध्ये आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप व आॅगस्टमध्ये विश्व चॅम्पियनशिप या प्रतिष्ठेच्या स्पर्धा होणार आहेत.सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू या दोन्ही खेळाडूंची अलीकडच्या कालावधीतील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. या दोन्ही खेळाडूआॅल इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करू शकतात, असे गोपीचंद यांना वाटते.ते म्हणाले, ‘यंदा कुणी भारतीय खेळाडू आॅल इंग्लंड स्पर्धेत जेतेपद पटकावेल, अशी मला आशा आहे. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि कादाम्बी श्रीकांत चांगली कामगिरी करीत आहेत. यंदा आॅल इंग्लंडमध्ये आमची कामगिरी चांगली ठरेल, असे मला वाटते.’भारतीय प्रशिक्षक पुढे म्हणाले, ‘सायनाने अलीकडेच इंडोनेशिया ओपनमध्ये जेतेपद पटकाविले आहे आणि सिंधूची कामगिरीही चांगली होत आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडू चांगली कामगिरी करू शकतात, असे मला वाटते. या स्पर्धेत भारतीय खेळाडूने जेतेपद पटकाविण्यास १८ वर्षांचा कालावधी लोटला असून, यंदा पराभवाचे दुष्टचक्र भेदण्यास यश येईल, अशी आशा आहे.’गोपीचंद यांनी २००१ मध्ये जेतेपद पटकाविले होते. त्याआधी, प्रकाश पदुकोण यांनी १९८० मध्ये हा पराक्रम केला होता.श्रीकांतकडून चांगल्या कामगिरीची आशा असल्याचे गोपीचंद यांनी यावेळी सांगितले.देशात बॅडमिंटनची लोकप्रियता वाढत असून, खेळाडूंच्या संख्येत प्रशिक्षकांची संख्या मात्र वाढलेली नाही. त्यावर लक्ष देण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय प्रशिक्षक गोपीचंद यांनी व्यक्त केले. गोपीचंद म्हणाले, ‘देशात दर्जेदार प्रशिक्षकांची वानवा आहे. आमच्यापुढे सर्वांत मोठे आव्हान प्रशिक्षकांची पुढची पिढी तयार करण्याचे आहे. अलीकडच्या कालावधीत विदेशी प्रशिक्षकांवर विसंबून राहण्याची वृत्ती वाढली आहे. त्यामुळे मायदेशात चांगले प्रशिक्षक तयार करणे गरजेचे आहे.’
भारतीय खेळाडू आॅल इंग्लंड स्पर्धेचे जेतेपद पटकावेल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 6:04 AM