नवी दिल्ली : सायना नेहवालसह भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटूंनी बॅडमिंटनचे नवे स्वरुप असलेल्या एअर बॅडमिंटनचे समर्थन केले आहे. त्यांच्या मते यात निवृत्ती स्वीकारणाऱ्या व्यावसायिक खेळाडूंसाठी पर्यायी करिअर उपलब्ध करण्याची क्षमता आहे. ‘आऊटडोअर बॅडमिंटन मनोरंजनासाठी भारतात सर्वांत आवडता क्रीडाप्रकार आहे आणि देशात यातून कमाई करण्याचा पर्याय असलेले स्थळही आहेत,’ असे मतही भारतीय खेळाडूंनी व्यक्त केले.
विश्व बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) एअर बॅडमिंटनला जागतिक पातळीवर गेल्या आठवड्यात ग्वांग्झूमध्ये सुरुवात केली आहे. त्यात कोर्टची लांबी-रुंदी वेगळी असेल. त्यात नव्या प्रकारच्या शटल्सचा उपयोग करण्यात येईल. त्याला एअर शटल म्हटले जाते. एअर शटलवर हवेचा प्रभाव कमी पडतो. दमट वातावरणाचाही त्यावर फारसा प्रभाव पडत नाही. आॅलिम्पिक कांस्य विजेती सायना म्हणाली, ‘एअर बॅडमिंटनमुळे या खेळाला भविष्यात चालना देण्यात मदत मिळेल आणि याचा जगातील विविध भागात प्रसार होईल.’
सायना नेहवाल पुढे म्हणाली, ‘भारतात या खेळाची जास्तीत जास्त ओळख आऊटडोअर खेळाच्या रुपाने होते. आम्ही हा खेळ आपल्या घराबाहेर आई-वडील, मित्रांसोबत खेळतो. बीडब्ल्यूएफचा या खेळाचा प्रचार-प्रसार करण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. यात हौशी खेळाडू सहभागी होण्यास उत्सुक असतील आणि जगभरात या खेळाची लोकप्रियता वाढण्यास मदत होईल.’
त्याचप्रमाणे भारताचा आघाडीचा शटलर एच. एस प्रणयच्या मते, एअर बॅडमिंटनमुळे निवृत्ती स्वीकारणाºया आंतरराष्ट्रीय व स्थानिक खेळाडूंसाठी पर्यायी करिअर उपलब्ध होईल. (वृत्तसंस्था)