बँकॉक : ‘फुलराणी’ सायना नेहवाल थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीला बुधवारी डेन्मार्कची होजमार्क जार्सफेल्ट हिच्याकडून पराभूत झाली. यासह या बीडब्ल्यूएफ विश्व टूर सुपर ३०० स्पर्धेत भारताचे आव्हान सुरुवातीलाच संपुष्टात आले.पाचव्या मानांकित सायनाला ४७ मिनिटांत १३-२१, २१-१७, १५-२१ असा पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत १८ व्या स्थानी असलेल्या सायनाचा रेकॉर्ड प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध ४-० असा होता. सायना याआधी इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभूत झाली होती.पुरुष एकेरीत भारताचा किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि समीर वर्मा हे देखील पहिल्याच फेरीत पराभूत झाले. वर्माला केवळ ३९ मिनिटात मलेशियाच्या ली जि जिया याने २१-१६, २१-१५ असे नमवले.दुसरीकडे, पाचव्या मानांकित श्रीकांत इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्तावितो याच्याकडून १२-२१, २१-१४, २१-१२ अशा गुणफरकाने पराभूत झाला. पहिला गेम गमावल्यानंतर श्रीकांतने चांगले पुनरागमन केले होते. मात्र त्याला लय राखता आली नाही. यंदा सलग तिसऱ्यांदा श्रीकांतला पहिल्या फेरीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. प्रणॉयला मलेशियाच्या लियू डिरेन याने १७-२१, २२-२०, १९-२१ असे नमवले. (वृत्तसंस्था)
सायनाच्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात, थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत निराशा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 3:47 AM