बासेल : जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू असा मान मिळवलेल्या पी. व्ही. सिंधूने स्पर्धेवर एकहाती वर्चस्व राखले. पहिल्या फेरीत चाल मिळाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचा अपवाद वगळता सिंधूने सर्व सामने सहज जिंकले.
उपांत्यपूर्व फेरीत चिनी तैपईच्या ताइ त्झू यिंगविरुद्ध १२-२१, २३-२१, २१-१९ असा झुंजार विजय मिळवत, सिंधूने सुवर्ण पदकाच्या दिशेने भक्कम वाटचाल केली. उपांत्य फेरीत चिनी आव्हानाचे संकट असताना सिंधूने एकतर्फी लढत ठरविताना, चेन यू फेइचा २१-७, २१-१४ असा सहज पराभव करून सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरी अटीतटीची होणार अशी अपेक्षा असताना, सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला एकही संधी न देता २१-७, २१-७ अशा अत्यंत एकतर्फी विजयासह दिमाखात सुवर्ण जिंकले. २०१७ साली ओकुहारानेच केलेल्या पराभवामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. त्या पराभवाचा वचपाही सिंधूने काढला.
याआधी सिंधू वि. ओकुहारा रेकॉर्ड ८-७ असा सिंधूच्या बाजूने होता. अत्यंत आक्रमक सुरुवात केलेल्या सिंधूने ८-१ अशी आघाडी घेत सामन्यात काय होणार आहे, याची झलक दिली. सिंधूच्या वेगवान व चपळ खेळापुढे ओकुहाराला अखेरपर्यंत संधी मिळाली नाही. याआधी सिंधूने या स्पर्धेत दोन कांस्य (२०१३ व २०१४) आणि दोन रौप्य (२०१७ व २०१८) जिंकले होते.झांग निगच्या विश्वविक्रमाची बरोबरी : चीनची माजी आॅलिम्पिक चॅम्पियन झांग निग हिनेही जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पाच पदकांची कमाई केली आहे. सिंधूने यंदा तिच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेल्या सिंधूचे अभिनंदन. संपूर्ण देशासाठी हा गौरवास्पद क्षण आहे. कोर्टवरील तुझा जादुई खेळ, कठोर मेहनत आणि निश्चय लाखो लोकांना रोमांचित आणि प्रेरित करतो. भविष्यातील सामन्यांसाठी जागतिक विजेतीला खूप शुभेच्छा!- रामनाथ कोविंद, राष्ट्रपतीजागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पटकावून अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय ठरलेल्या पी. व्ही. सिंधूने इतिहास रचला. भारताला सिंधूवर गर्व आहे. मी मनापासून तिचे अभिनंदन करतो. चॅम्पियन तयार करण्यासाठी सरकार सर्वश्रेष्ठ मदत आणि सुविधा कायम उपलब्ध करून देत राहणार. - किरेन रिजीजू, केंद्रीय क्रीडामंत्री