हाँगकाँग : सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरीची जोडी आपली शानदार कामगिरी मंगळवारपासून सुरु होत असलेल्या हाँगकाँग ओपनमध्ये कायम ठेवण्यास उत्सुक असतील. त्याचवेळी, चाहत्यांची नजर पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यावर राहील. या भारतीय खेळाडू पुन्हा एकदा सुरुवातीलाच गाशा गुंडाळण्याचे दृष्टचक्र भेदण्यास प्रयत्नशील असतील.जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेली भारतीय जोडी फ्रेंच ओपनमध्ये उपविजेता ठरली होती, तर गेल्या आठवड्यात त्यांनी चीन ओपनमध्ये उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते. या स्पर्धेत सात्विक व चिराग जोडीकडून पुन्हा एकदा चमकदार कामगिरीची आशा आहे. पुरुष गटात किदाम्बी श्रीकांतपुढे पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या केंटो मोमोटाचे खडतर आव्हान आहे.>सात्विक साईराज रंकीरेड्डी मिश्र दुहेरी गटात अश्विनी पोनप्पासोबत खेळणार आहे. पहिल्या फेरीत भारतीय जोडीविरुद्ध थायलंडच्या निपीतफोन फुन्गुफ्रुपेत आणि सावित्री अमित्रापाई यांचे आव्हान राहील. अश्विन व एन. सिक्की रेड्डी महिला दुहेरीमध्ये तर प्रणव जेरी चोपडा व सिक्की मिश्र दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करतील.
सिंधू, सायनाच्या फॉर्मकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 4:11 AM