मुंबई : भारताच्या पी. व्ही. सिंधूनं जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. या मानाच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. सिंधूला यापूर्वी 2017 आणि 2018 मध्ये जेतेपदाने हुलकावणी दिली होती, परंतु तिने तिसऱ्या प्रयत्नात अखेर सुवर्णपदक नावावर केले. अंतिम सामन्यात सिंधूनं जपानच्या ओझोमी नाकाहुराला 21-7, 21-7 अशी हार मानण्यास भाग पाडले. सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरीचे देशवासियांनी भरभरून कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिंधूच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. एकिकडे सिंधूचे कौतुक होत असताना मुंबईच्या एका सुवर्णकन्येनेही जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णकमाई केली आणि तिच्या कौतुकासाठी सोशल मीडिया एकवटले आहे.
पॅरा बॅडमिंटनपटू मानसीही जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिने SL3 गटाच्या अंतिम सामन्यात तीन वेळच्या विश्वविजेत्या पारुल परमारचा 21-12, 21-7 असा पराभव केला. 2011मध्ये रस्ता अपघातात मानसीला एक पाय गमवावा लागला. तिला अनेक जखमा झाल्या. पण, या अपघातानंतर ती खचली नाही. एका वर्षातच तिने कृतिम पायावर चालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिचा पॅरा बॅडमिंटनपटूचा प्रवास सुरू झाला. आंतर कचेर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले.
2014मध्ये मानसीनं पॅरा आशिया स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रयत्न केले, परंतु तिला यश आले नाही. त्याच वर्षी तिने कारकिर्दीतीली पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. पुढील वर्षी स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने सहभाग घेतला आणि पाचवे स्थान पटकावले. ''विश्वविजेती ही ओळख खूप सुखावणारी आहे. माझ्यासारख्या खेळाडूला हे यश मिळवणे आव्हानात्मक आहे. हा माझ्यासाठी अविश्वसनीय क्षण आहे,'' असे मानसीने सांगितले. 2020च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक पटकावण्याचा तिने निर्धार केला आहे.