मुंबई - जपानमध्ये सुरू असलेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या श्रीकांत किदम्बीला पराभव पत्करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत किदम्बीला दक्षिण कोरियाच्या ली डाँग केउनकडून हार मानावी लागली. या पराभवाबरोबर स्पर्धेतील भारतीयांचे आव्हानही संपुष्टात आले आहे. किदम्बीने तिसऱ्या गेममध्ये परतीचे बरेच प्रयत्न केले, परंतु त्याला अपयश आले.
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधू आणि एच एस प्रणॉय यांच्या पराभवानंतर भारताचे आव्हान टिकवण्याची जबाबदारी किदम्बीवर होती. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पहिला गेम घेत सुरूवातही चांगली केली. त्याने जबरदस्त स्मॅश आणि परतीच्या फटक्यांचा उत्तम खेळ करताना पहिला गेम 21-19 असा घेतला. मात्र त्याला पुढील गेममध्ये केउनकडून 16-21 असे प्रत्युत्तर मिळाले,.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी चुरशीचा खेळ केला. किदम्बीने कोरियन खेळाडूला मॅच पॉईंट घेण्यापासून रोखले, परंतु त्याचे प्रयत्न तोकडे पडले. केउनने हा गेम 21-18 असा घेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.