ग्लासगो, दि. 24 - जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी आपला विजयी धडाका कायम ठेवला आहे. स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने आज झालेल्या सामन्यात डेन्मार्कच्या अॅण्टोन एन्टोंसेनचा 21-14, 21-18 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह किदाम्बी श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. यूकेमध्ये ग्लासगो येथे ही स्पर्धा सुरु आहे. यंदा पहिल्यांदाच भारत सुवर्ण पदकाचा दावेदार म्हणून खेळत असून भारताची मदार पुरुष गटात श्रीकांतवर, तर महिला गटात पी. व्ही. सिंधूवर आहे. श्रीकांतने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवताना पहिल्या दिवशी सर्जीचा २१-१३, २१-१२ असा ३० मिनिटांहून कमी वेळेत धुव्वा उडवला. सर्वच क्षेत्रात वर्चस्व राखताना श्रीकांतने सर्जीला पुनरागमन करण्याची एकही संधी न देताना बाजी मारली. दुस-या फेरीत श्रीकांतने फ्रान्सच्या लुकास कोर्वीचा पराभव केला होता. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी चांगली सुरुवात केली. अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने स्वित्झर्लंडच्या सबरीना जॅक्वेटवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. तिने सबरीनावर 21-11, 21-12 असा विजय मिळवून उपउपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला. याव्यतिरीक्त बी. साई प्रणितने आपल्या प्रतिस्पर्ध्याची झुंज मोडून काढत पुढच्या फेरीत प्रवेश केला. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये भारताचे खेळाडू कशी कामगिरी करतात हे पहावं लागणार आहे.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत किदाम्बी श्रीकांतची आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 6:57 PM