नवी दिल्ली : भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. श्रीकांतने जागतिक क्रमवारीतील पुरुषांच्या विभागात डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलसनला पिछाडीवर टाकत अव्वल स्थानाला गवसणी घातली आहे. गेल्या वर्षीही श्रीकांत अव्वल स्थान पटकावण्याच्या समीप आला होता, पण त्यावेळी दुखापतीमुळे त्याला अव्वल स्थान मिळवता आले नव्हते. यापूर्वी भारताचे माजी महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी 1980 साली क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते.
जागतिक क्रमवारीत श्रीकांतने 76,895 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. व्हिक्टरच्या नावावर 75, 470 गुण असून तो दुसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर कोरियाचा सोन वेन हू आहे, त्याच्या खात्यात 74, 670 एवढे गुण आहेत.
श्रीकांतने गेल्या वर्षात चार सुपर सीरिज स्पर्धेची जेतेपदे पटकावली होती. यामध्ये इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, फ्रान्स या सुपर सीरीजचा समावेश होता. एका वर्षात चार सुपर सीरिज जिंकणारा श्रीकांत हा जगातील चौथा खेळाडू ठरला होता. त्यानंतर 2 नोव्हेंबर 2017 ला जाहीर करण्यात आलेल्या जागतिक क्रमवारीत श्रीकांतने दुसरे स्थान पटकावले होते.
महिलांच्या क्रमवारीत भारताची पी. व्ही. सिंधू 78, 824 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत चायनीज तैपेईची ताइ जू इंग 90, 259 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. महिलांमध्ये भारताच्या सायना नेहवालने 2015 मध्ये मार्च महिन्यात अव्वल स्थान पटकावले होते.