नवी दिल्ली : एका स्पर्धेतून मधेच माघार घेतल्याप्रकरणी माफी मागितल्यानंतर भारतीय बॅडमिंटन संघटनेने किदाम्बी श्रीकांत याच्या नावाची शुक्रवारी ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस केली. अर्जून पुरस्कारासाठी नामांकन न दिल्याबद्दल आगपाखड करणारा एच. एस. प्रणॉय याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.श्रीकांत आणि प्रणॉय हे फेब्रुवारीत मनिला येथे आशियाई चॅम्पियनशिपचा उपांत्य सामना खेळले नव्हते. दोघेही अन्य एका स्पर्धेसाठी बार्सिलोनाकडे रवाना झाले होते. भारताने उपांत्य सामना गमावल्यान्ंतर तिसऱ्या स्थानी समाधान मानले होते. दोघांविरुद्ध शिस्तभंग म्हणून बीएआयने क्रीडा पुरस्कारासाठी नावे पाठवली नव्हती. श्रीकांतने ई-मेलद्वारे माफी मागताच त्याचा अर्ज क्रीडा मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. भविष्यात अशा चुकीची पुनरावृत्ती न करण्याची त्याने हमी दिली आहे. दुसरीकडे प्रणॉयला १५ दिवसाच्या आत उत्तर देण्याची नोटीस बजावण्यात आली. उत्तर न दिल्यास आणखी कठोर कारवाईचा इशारा महासंघाने दिला आहे. बीएआयकडून प्रणॉयऐवजी समीर वर्मा याचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पुढे करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
माफीनाम्यानंतर किदाम्बीची ‘खेलरत्न’साठी शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 2:21 AM