ओडेन्से (डेन्मार्क) : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने अगदीच एकतर्फी लढतीत आज येथे डेन्मार्क ओपनच्या अंतिम सामन्यात कोरियाच्या ली ह्युन इल याचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. या वर्षी इंडोनेशिया ओपन आणि आॅस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद पटकावणाºया आठव्या मानांकित श्रीकांतने ओडेंसे स्पोर्टस् पार्कमध्ये आपल्यापेक्षा १२ वर्षांनी मोठा असणाºया ली याचा अवघ्या २५ मिनिटांत २१-१०, २१-०५ असा धुव्वा उडवला.जागतिक क्रमवारीतील श्रीकांतचे हे तिसरे सुपर सीरिज प्रीमिअरचे विजेतेपद आहे. याआधी त्याने २०१४ मध्ये चीन ओपन, तर या वर्षी इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. श्रीकांतने त्याच्यापेक्षा जास्त अनुभवी ३७ वर्षीय ली याला डोके वर काढण्याची उसंतच मिळू दिली नाही. ली याने शनिवारी उपांत्य फेरीत त्याच्याच देशाच्या व जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित सोन वॉन हो याचा पराभव केला होता; परंतु तो या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. शुक्रवारी श्रीकांतने डेन्मार्कच्या व्हिक्टरला उपांत्यपूर्व फेरीत ५६ मिनिटांत नमविले होते. शनिवारी श्रीकांतने हाँगकाँगच्या विंग की व्हिन्सेंट वाँगला ३९ मिनिटांत नमवून अंतिमफेरीत धडक मारली होती.तत्पूर्वी, २०१३ ची विश्वचॅम्पियन थायलंडची रतचानोक इंतानोन हिने जपानच्या चौथ्या मानांकित अकाने यागामुची हिचा एक तास आणि ६ मिनिटांच्या लढतीत १४-२१, २१-१५ २१-१९ असा पराभव करीत या हंगामातील पहिले विजेतेपद पटकावले.
किदांबी श्रीकांतने जिंकले डेन्मार्क ओपनचे विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 3:55 AM