मेलबर्न- ज्या स्पर्धेत 20 वर्षांपूर्वी त्याचे वडील चॅम्पियन ठरले त्याच स्पर्धेत 20 वर्षानंतर मुलाने चॅम्पियन बनून यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये इतिहास घडवला. अमेरिकेच्या कोर्डा पितापुत्रांनी ही ऐतिहासिक कामगिरी बजावली. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत 20 वर्षापूर्वी म्हणजे 1998 साली पीटर कोर्डा पुरुष एकेरीत विजेता ठरला होता. आणि आता त्याचा मुलगा सेस्टियन (सेबी) कोर्डा शनिवार ऑस्ट्रेलियन ओपनच्या ज्युनियर मुलांच्या गटात विजेता ठरला. अंतिम सामन्यात त्याने तैवानच्या चून सीन त्सेंगवर 7-6(8-6), 6-4 असा विजय मिळवला. या विजयानंतरच्या भाषणात सेबीने आपल्या वडिलांना वाढदिवसाची संस्मरणीय भेट देताना त्यांना 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छासुध्दा दिल्या.
सेबीच्या या विजयानंतर अभिमानी पिता पीटर म्हणाले, " सेबी आमच्या घराची यशाची परंपरा कायम ठेवतोय याचा मला अभिमान आहे."
पीटरच्या म्हणण्याप्रमाणे कोर्डा कुटुंबाला यशाची परंपरा आहे. तो स्वतः ऑस्ट्रेलियन ओपनचा 1996 मध्ये दुहेरीत आणि 1998 मध्ये एकेरीत चॕम्पियन होता. त्याची पत्नी म्हणजे सेबीची आई रेजिना आघाडीची टेनिसपटू होती. तिच्या काळात ती जागतिक क्रमवारीत 26 व्या स्थानापर्यंत पोहचलेली होती. पीटरच्या दोन्ही मुली गोल्फ खेळतात. त्यापैकी जेसिका हिने 2012 मध्ये योगायोगाने गोल्फमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचेच विजेतेपद पटकावले आहे. हे पाहता पीटर व जेसिकानंतर सेबी हा कोर्डा कुटुंबातील तिसरा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आहे.
सेबीने टेनिसशिवाय इतर कोणताही खेळ खेळावा अशी पीटरची इच्छा होती. आणि सुरुवात तशी झालीसुध्दा होती. सेबी सुरुवातीला हॉकी खेळत होता पण 2009 च्या युएस ओपनवेळी तो वडिलांसोबत सामने बघायला गेला आणि टेनिसच्या प्रेमातच पडला. आणि आता 2005 नंतर ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुलांचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला अमेरिकन ज्युनियर ठरला आहे.
तैवानच्या लियांग एन शुओचे ऐतिहासिक यश
सेबस्टियन कोर्डाप्रमाणेच तैवानच्या लियांग एन शुओ हिने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ऐतिहासिक यश प्राप्त केले. तिच्या देशाची ती पहिली ग्रँड स्लॅम चॅम्पियन ठरली. मुलींच्या एकेरीत तिने फ्रान्सच्या क्लारा बुरेल हिला 6-3, 6-4 अशी मात दिली. तैवानने याआधी दुहेरीत ग्रँड स्लॅम चॅम्पियन पाहिल्या आहेत पण एकेरीतील लियांग ही त्यांची पहिलीच चॅम्पियन. उपांत्य फेरीत ती हरता-हरता वाचली होती. त्या सामन्यात दोन मॅचपॉईंट वाचवत तिने अंतीम फेरीत धडक मारली होती.