सोल : आॅलिम्पिक रौप्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू हिने चीनच्या ही बिंगजियाओ हिचा पराभव करीत कोरिया ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. आता विजेतेपदासाठी तिचा सामना विश्व चॅम्पियन जपानच्या नोजोमी ओकुहाराविरुद्ध होईल. भारताची २२ वर्षीय सिंधू हिचा चीनच्या खेळाडूविरुद्धचा रेकॉर्ड ३-५ असा होता. यावर्षीच ती आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत बिंगजियाओकडून पराभूत झाली होती. असे असतानाही जगातील सातव्या क्रमांकाच्या खेळाडूला तिने २१-१०, १७-२१, २१-१६ ने पराभूत केले.सिंधू सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी तिने चायना सुपर सिरिज जिंकली होती. सत्राच्या सुरुवातीलाच इडिया सुपर सिरिज आणि सय्यद मोदी ग्रांप्री किताबही तिने पटकाविला. आता पुन्हा एक किताब मिळवण्याच्या ती केवळ एक पाऊल दूर आहे. सिंधूसाठी अंतिम सामना आव्हानात्मक असेल. कारण ओकुहाराविरुद्ध ती विश्व चॅम्पियनशिपमध्ये पराभूत झाली होती. आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती ओकुहारा हिने जगातील दुसºया क्र्रमांकाची अकाने यामागुची हिचा २१-१७, २१-१८ ने पराभव केलेला आहे.असा रंगला सामना... : सुरुवातीलाच सिंधूने वर्चस्व गाजवले. तिने ९-१ अशी आघाडी मिळवली होती. ब्रेकवेळी तिची आघाडी ११-४ अशी होती. सिंधूने १० गुणांची मोठी आघाडी मिळवली होती. बिंंगजियाओने पुनरागमनासाठी प्रयत्न केले; मात्र ती पहिल्या गेममध्ये सिंधूला रोखू शकली नाही. दुसºया गेममध्ये ४-४ अशी सुरुवात झाली. ब्रेकपर्यंत तिने पाच गुणांची आघाडी घेतली होती. सिंधूने या वेळीही चुका केल्याने स्कोअर १०-१३ असा झाला. मात्र, चीनच्या खेळाडूने जबरदस्त पुनरागमन करीत सामना १५-१५ ने बरोबरीवर आणला. त्यानंतर सिंधूचे दोन शॉट बाहेर गेले आणि एक रिटर्न नेटमध्ये गेला त्यामुळे चीनच्या खेळाडूला २०-१६ अशी आघाडी मिळवता आली. तिने दुसरा गेम जिंकूनसिंधूला तिसरा गेम खेळण्यास भाग पाडले. तिसºया गेममध्ये दोघींनी सारखा प्रतिकार केला; मात्र बाजी मारली ती सिंधूने.
कोरिया ओपन : पी. व्ही. सिंधू फायनलमध्ये, नोजोमी ओकुहाराविरुद्ध होणार सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 1:20 AM