सेऊल, दि. 15 - भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधूने अपेक्षित कामगिरी करताना कोरिया ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यफेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपांत्यापूर्वफेरीच्या सामन्यात ऑलिम्पिक रौप्य विजेत्या सिंधूने जपानच्या मितासू मितानीचा 21-19 18-21 21-10 असा पराभव केला. मितासू 2014च्या विश्व चॅम्पियनशिपची कांस्य विजेती असून, 2012च्या फ्रेंच ओपन फायनलमध्ये तिने सायना नेहवालचा पराभव करीत विजेतेपद पटकविले होते.
ऑलिम्पिक रौप्य विजेत्या सिंधूचा उपांत्यफेरीतील सामना सँग जी ह्युन आणि ही बिंगजिओ यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
या सामन्यात आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना सिंधूनं पूर्ण कोर्टचा उपयोग केला. तिचे फोरहँडच्या फटक्यांनी सामन्याचा निर्णय तिच्या बाजूने लावला. हा सामना जिंकण्यासाठी सिंधूला 63 मिनिटे लागली. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला सिंधूने 5-2 अशी आघाडी घेतली. मितानीने तिची आघाडी कमी करत पहिला सेट 8-6 असा केला. सामन्यात मिड इंटरव्हलसाठी थांबला तेव्हा मितानी 11-9 अशी आघाडीवर होती. सिंधूने त्यानंतर हा सेट 13-13 असा बरोबरीत आणला. दोन्ही खेळाडू 19-19 अश्या बरोबरीत आल्यावर सिंधूने आपला खेळ उंचावत पहिला सेट 21-19 असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये मितानी हिने उत्तम प्रदर्शन करताना 5-1 अशी आघाडी सिंधूने सलग गुण मिळवत तिची आघाडी 5-4 अशी केली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडू 8-8 अश्या बरोबरीत होत्या. त्यानंतर मितानीने सेटवर वर्चस्व गाजवत दुसरा सेट 21-16 असा जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये सिंधूनं आपला खेळ पहिल्यापासूनच उंचावला. या सेटमध्ये सुरुवातीला सिंधूने 6-2 अशी आघाडी मिळवली. मितानी केलेल्या चुकामुळे सिंधूने निर्णायक सेटमध्ये 9-3 अशी मोठी आघाडी मिळवली. त्यानंतर सिंधूने या सेटमध्ये वर्चस्व स्थापन करताना 15-9 अशी आघाडी मिळवली. यातून मितानीला सावरायला संधीच मिळाली नाही. शेवटचा सेट सिंधूने 21-10 असा जिंकत सामना आपल्या नावे केला.
सिंधूचा कोरिया सुपर सिरीजमधील प्रवास - महिला एकेरीत सिंधूने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानी असलेल्या हाँगकाँगच्या चेउंग नगान हिला सरळ दोन गेममध्ये 21-13, 21-8 असा पराभव केला होता. ऑलिम्पिक रौप्य विजेती सिंधूने थायलंडची नितचाओन जिदापोलवर २२-२०, २१-१७ अशा फरकाने विजय नोंदविला.
प्रणव, सिक्की रेड्डी यांचे आव्हान संपुष्टात - मिश्र दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. सात्विक साईराज रंकीरेड्डी - अश्विनी पोनप्पा यांना पहिल्या फेरीत तांग चुन मान - तसे यिंग सुएत या हाँगकाँगच्या जोडीने २१-१८, २१-१९ असे नमवले. दुसरीकडे, प्रणव चोप्रा - एन. सिक्की रेड्डी यांचा इंडोनेशियाच्या प्रवीण जॉर्डन - डेबी सुसांतो यांच्याविरुद्ध २१-१३, १९-२१, १५-२१ असा पराभव झाला.
बी. साईप्रणीतही पराभूतसाईप्रणीत हा दुस-या फेरीत चिनी-तैपेईचा सातवा मानांकित ज्यु वेई वांग याच्याकडून ४० मिनिटांत १३-२१, २४-२६ अशा फरकाने पराभूत झाला. दुहेरीत मात्र साईराज रेंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी चिनी-तैपेईची जोडी ले हुएई-ली यांग यांच्यावर ५१ मिनिटांत २३-२१, १६-२१, २१-८ ने विजय साजरा केला.