मरखम (कॅनडा) : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने मलेशियाचा आदिल शोलेह अली सादिकीन याच्यावर २१-८, २१-१८ अशा फरकाने विजय नोंदवित बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या लक्ष्यने अवघ्या ३१ मिनिटांत उपांत्यपूर्व सामना जिंकला. त्याने पहिल्या गेममध्ये वर्चस्व गाजवित सामना जिंकला. दुसºया गेममध्ये मलेशियाच्या खेळाडूने काहीसा प्रतिकार केला, पण लक्ष्यपुढे त्याची डाळ शिजली नाही.उपांत्य फेरीत लक्ष्यचा सामना अव्वल मानांकित थायलंडचा कुनलावूत वितिदसर्न याच्याविरुद्ध होईल. कुनलावूत याने इंडोनेशियाचा अल्बर्टो अल्विन युलियांतो याच्यावर २१-१४, २१-१७ ने मात केली.विजयानंतर लक्ष्य म्हणाला, ‘उपांत्य फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडू चांगलाच आहे. त्याला नमविण्यासाठी मला माझे सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे लागेल. त्यासाठी सज्ज आहे. भारताचा विष्णू वर्धन आणि कृष्णा साई पोडिले यांची पुरुष दुहेरी जोडी मात्र उपांत्यपूर्व सामन्यात कोरियाचे ताए यांग शिन-चान वांग यांच्याकडून ११-२१, ८-११ ने पराभूत झाली. (वृत्तसंस्था)
लक्ष्य सेन उपांत्य फेरीत; विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 5:17 AM