क्वालालंपूर - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कडव्या संघर्षानंतर पराभव पत्करावा लागला. पुन्हा एकदा दडपणामुऴे सिंधूला हार पत्करावी लागली. महत्वाच्या लढतीत सामना तिस-या गेमपर्यंत गेल्यास सिंधू प्रचंड ताण घेते आणि त्याचा तिच्या खेऴावर परिणाम होतो. याचीच प्रचिती मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आली. तिच्यासह पुरूष एकेरीत श्रीकांत किदम्बीलाही पराभव पत्करावा लागल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.चायनिज तैपेईच्या ताय झु यिंगविरूद्घ सिंधूला नेहमी झगडावे लागते. जय-पराजयाच्या आकडेवारीत यिंग 9-3 अशी आघाडीवर आहे आणि सामना तिस-या गेममध्ये गेल्यावर सिंधू निष्प्रभ होते, ही चाल यिंग ओऴखून आहे. तिस-या गेममध्ये यिंगने हीच संधी हेरून विजय निश्चित केला. सिंधूने 0-1 अशा पिछाडीवरून मुसंडी मारली, परंतु तिला तो संघर्ष कायम राखण्यात अपयश आले. यिंगने 21-15, 19-21, 21-11 असा विजय मिऴवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पुरूष एकेरीत एकमेव आशास्तान असलेल्या श्रीकांतलाही उपांत्य फेरीचा अडथऴा पार करता आला नाही. जपानच्या केंटो मोमोटाने 21-13, 21-13 अशी सहज बाजी मारली.