नागपूर : नागपूरची प्रतिभावान बॅडमिंटनपटू मालविका बन्सोडने तिच्यापेक्षा सरस मानांकन असलेल्या खेळाडूचा पराभव करीत सिनिअर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. शहरातील अन्य खेळाडू वैष्णवी भाले व रितिका ठाकेर यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला. मृण्मयी सावजीने महिला दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मृण्मयीने मानसी जोशीच्या साथीने खेळताना तानिष्क एम-सोनिका साई पी. या जोडीची झुंज २१-८, २१-२३, २१-१६ ने मोडून काढली.महाराष्टÑ बॅडमिंटन संघटनेतर्फे मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळच्या सत्रात झालेल्या महिला एकेरीतील चौथ्या फेरीतील चुरशीच्या लढतीत मालविका बन्सोडने तिच्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या आसामच्या अस्मिता चहलला पराभवाचा धक्का दिला. पहिला गेम जिंकत मालविकाने आघाडी घेतली. परंतु, दुसºया गेममध्ये अस्मिताने बरोबरी साधली. तिसºया व निर्णायक गेममध्ये मालविका सुरुवातीला पिछाडीवर होती, पण त्यानंतर तिने चमकदार कामगिरी करीत सलग ९ गुण वसूल केले आणि गेम जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. ४३ मिनिटे रंगलेल्या या लढतीत मालविकाने २१-१६, १६-२१, २१-१८ ने सरशी साधत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला. तिसºया फेरीत अस्मिता चहलने नागपूर येथील प्रतिभावंत बॅडमिंटनपटू द्वितीय मानांकित मुग्धा आग्रेला १७-२१, २१-१५, २१-१३ पराभूत केले होते.नवव्या मानांकित वैष्णवी भालेचे आव्हान संपुष्टात आले. रेल्वेच्या सायली राणेने वैष्णवीला २१-१६, २१-१० ने नमविले. रितिका ठाकेरला चौथ्या फेरीत संघर्षपूर्ण खेळानंतर एअर इंडियाच्या पूर्वा बर्वेकडून २१-१३, १९-२१, २२-२० ने पराभव स्वीकारावा लागला.
मालविका, मृण्मयी यांची आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:02 AM