रोहित नाईक मुंबई : ‘जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) आणलेल्या सर्विसच्या नवीन नियमांविरुद्ध खेळाडू काही करू शकत नाहीत. त्यांना त्याप्रमाणे खेळावेच लागेल. या निर्णयानुसार अद्याप माझ्या सर्विसमध्ये कोणतीही चूक समोर आलेली नसली, तरी सर्विस फॉल्ट ठरविणे हे प्रत्येक पंचाच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. हा नियम पारदर्शक नसल्याने येत्या काही काळात हा नियम रद्द केला, तर नक्कीच याचा फायदा खेळाडूंना होईल,’ असे मत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याने ‘लोकमत’कडे व्यक्त केले.४ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने त्याने ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. बॅडमिंटनमध्ये सर्विसच्या बदललेल्या नियमांचा फटका काही दिवसांपूर्वीच भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतला बसला होता. यामुळे आॅल इंग्लंड स्पर्धेतून त्याला अनपेक्षितपणे आपला गाशा गुंडाळावा लागला होता. याविषयी प्रणॉय म्हणाला की, ‘नवीन नियम अंमलात आणल्यापासून माझ्या सर्विसमध्ये एकदाही दोष आढळला नाही. नव्या नियमानुसार सर्विस चुकीचे ठरविणे हे पूर्णपणे पंचांच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे. प्रत्येक पंच याकडे आपल्या परीने पाहात असल्याने, या नियमात पारदर्शीपणा नाही आणि त्याचा फटका खेळाडूंना बसतो. तरी बीडब्ल्यूएफच्या नियमांविरुद्ध आम्ही काहीही करू शकत नाही. आम्हाला नव्या नियमांप्रमाणे तडजोड करून खेळावेच लागते. कदाचित, पुढील २-३ महिन्यांमध्ये हा नियम रद्द करण्यात आला, तर निश्चित याचा खेळाडूंना फायदा होईल.’राष्ट्रकुलच्या तयारीबाबत प्रणॉय म्हणाला की, ‘आॅल इंग्लंड स्पर्धेनंतर राष्ट्रकुलसाठी तयारी करण्यास आम्हाला १० दिवस मिळाले. या कालावाधीत फार काही बदल करता आला नसले तरी चांगली तयारी झाली आहे. आता केवळ गोल्ड कोस्ट येथील परिस्थितींशी जुळवून घ्यायचे आहे.’भारतीय संघ कागदावर खूप मजबूत दिसत आहे. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, के. श्रीकांत यांच्यासह दुहेरीतही भारतीय चांगले खेळत आहेत. सांघिक गटामध्ये भारताला पदक जिंकण्याची खूप चांगली संधी आहे. सांघिक गटात भारत सुवर्ण जिंकेल, अशी आशा आहे.- एच. एस. प्रणॉय
सर्विसचा नवा नियम पारदर्शक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 3:00 AM