फुजोऊ - भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने चीन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. आज झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सिंधूने चीनच्या हान यू हिच्यावर 21-15, 21-13 अशी सरळ गेममध्ये मात केली. सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आल्याने स्पर्धेतील महिला गटात भारताची मदार आता सिंधूवरच आहे. एकतर्फी झालेल्या लढतीत सिंधुने चिनी प्रतिस्पर्ध्यावर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. तिने आक्रमक खेळ करून पहिला गेम 21-15 अशा फरकाने तर दुसरा गेम 21-13 अशा फरकाने जिंकून उपांत्य फेरी गाठली. तत्पूर्वी भारताच्या सायना नेहवालचे चीन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. सलामीच्या लढतीत अमेरिकेच्या बेईवान झँग हिला पराभूत करणाऱ्या सायनाला या लढतीत जपानच्या पाचव्या मानांकीत अकाने यामागुची हिचे आव्हान परतवून लावणे शक्य झाले नाही. सायनाला 18-21, 11-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. यामागुचीविरुद्धच्या लढतीत सायनाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पहिल्याच गेममध्ये सायनाचे आव्हान मोडीत काढताना यामागुची हिने गेम 21-18 अशा फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये यामागुचीने संपूर्ण वर्चस्व राखत सायनाला 11-21 अशी मात दिली आणि तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. पहिल्या फेरीत सायनाने अमेरिकेच्या बेइवान झैंग हिला केवळ ३० मिनिटांमध्ये २१-१२, २१-१३ असे नमवून शानदार आगेकूच केली होती. त्याआधी काल लागलेल्या एका धक्कादायक निकालामध्ये पाचवेळचा जागतिक आणि दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन चीनच्या लीन डॅनचा चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक पराभव झाला होता. तब्बल ७ मॅच पॉइंट वाचवल्यानंतर लीनला पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला हे विशेष. इंडोनेशियाचा जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानी असलेल्या जोनाथन ख्रिस्टी याने लीनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला होता. जोनाथनने दोन गेमपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात खळबळ माजवताना बलाढ्य लीनचे २१-१९, २१-१६ असे आव्हान संपुष्टात आणले होते.
भारताच्या पी. व्ही. सिंधूची चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 6:17 PM