नवी दिल्ली : आॅलिम्पिक व विश्व चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेता पी.व्ही. सिंधूला दुखापत झाली आहे, पण पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतील तिच्या सहभागाबाबत कुठली साशंकता नाही. भारताचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद व सहायक प्रशिक्षक मोहम्मद सियादुतल्लाह यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादच्या गोपीचंद अकादमीमध्ये सराव करीत असलेल्या २२ वर्षीय सिंधूच्या टाचेला दुखापत झाली.सिंधूचे वडील पी.व्ही. रमन्ना यांनी सांगितले,‘मंगळवारी अकादमीमध्ये सरावादरम्यान तिच्या टाचेला दुखापत झाली. एमआरआय करण्यात आल्यानंतर सर्वकाही सुरळीत असल्याचे स्पष्ट झाले. हाड किंवा स्नायूला दुखापत झालेली नाही, त्यामुळे गंभीर बाब नाही. आम्ही कुठली जोखिम पत्करण्यास तयार नाही.’रमन्ना पुढे म्हणाले,‘आता ती एक दिवस विश्रांती घेईल आणि त्यानंतर सरावास सुरुवात करेल. ती बुधवारी मैदानावर राहील. राष्ट्रकुल स्पर्धेची सुरुवात सांघिक स्पर्धेने होईल. पुरेसा वेळ असल्यामुळे चिंतेची बाब नाही.’ जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानी असलेली सिंधूला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानले जात आहे. तिने २०१४ मध्ये ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य जिंकले होते.
पी. व्ही. सिंधूला दुखापत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 3:54 AM