ठळक मुद्देभारताच्या पी. व्ही. सिंधूने BWF World Tour Finals स्पर्धेतील महिला गटाचे जेतेपद पटकावले.2018 मधील पहिलेच जेतेपद
ग्वांग्यू : भारताच्या पी. व्ही. सिंधूने BWF World Tour Finals स्पर्धेतील महिला गटाचे जेतेपद पटकावले. तिने कारकिर्दीतील 300व्या विजयाची नोंद करताना जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव केला. BWF World Tour Finals स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. तसेच 2018 मधील तिचे हे पहिलेच जेतेपद आहे. 23 वर्षीय सिंधूने अंतिम लढतीत 21-19, 21-17 असा विजय मिळवला. सिंधूचे हे कारकिर्दीतील 14वे जेतेपद आहे. 2013 साली सिंधूने येथेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिले पदक जिंकले होते आणि रविवारी तिने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने जपानी खेळाडूचा कडवा संघर्ष मोडून काढताना तंदुरूस्ती आणि मानसिक कणखरतेची प्रचिती दिली. 2018 मध्ये सिंधूला एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही, परंतु तिने वर्षाअखेरच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बाजी मारली. याआधी 2009 मध्ये वाँग मेव चूने केवळ वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. 2018 मध्ये सिंधूला सलग सात स्पर्धांच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता आणि त्यात आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धांचाही समावेश आहे. आजच्या लढतीत सिंधूने आक्रमक खेळ करताना 7-3 अशी आघाडी घेतली. त्यानंतर 13व्या गुणासाठी सिंधू व ओकुहारा यांच्यात 44 फटक्यांची रॅली रंगली. सिंधूने सामन्यावर पकड घेताना आघाडी 14-6 अशी मजबूत केली. मात्र, 2017च्या विश्वविजेत्या ओकुहाराने 12 पैकी 10 गुण घेत सामना 16-16 असा बरोबरीत आणला. सिंधूने तणाव न घेता सातत्यपूर्ण खेळ करताना पहिला गेम 21-19 असा घेतला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने झटपट गुण कमावले, परंतु ओकुहारानेही कडवा प्रतिकार केला. सिंधूने हा गेम 21-17 असा घेत इतिहास घडवला.