लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ६ कोटी ८८ लाख रुपये खर्च करून दीड वर्षापूर्वी बांधलेल्या तीन मजली इमारतीत सुविधा उपलब्ध करून न दिल्याने कैदी, मनोरुग्ण व बालरुग्णांची सुविधांअभावी हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे.येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांची मोठी संख्या असल्याने विविध भागांसाठी स्वतंत्र इमारत बांधकामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मनोरुग्ण विभाग, कैदी विभाग आणि बाल रुग्णांसाठी स्वतंत्र तीन मजली इमारत बांधकामास मंजुरी मिळाली. त्यानुसार रुग्णांसाठीच्या इमारतीबरोबरच प्रशासकीय कामकाजासाठी तीन मजली इमारत बांधण्यात आली. या दोन्ही इमारतींचा खर्च साधारणत: ६ कोटी ८८ लाख ६८ हजार रुपयांपर्यंत गेला आहे.दीड वर्षापूर्वी बाल रुग्ण इमारत जिल्हा सामान्य रुग्णालयास हस्तांतरित करण्यात आली. या ठिकाणी सध्या बाल संगोपन कक्ष, बाल पोषण पूनर्वसन केंद्र, कैदी विभाग, मनोरुग्ण व बालरुग्ण विभाग चालविले जातात; परंतु, दीड वर्षातच प्रवेशद्वारापासूनच या इमारतीची दुरुवस्था झाली आहे.तीन मजली इमारतीसाठी बसविलेली लिफ्ट उद्घाटनापासून आजपर्यंत सुरू नसून केवळ लिफ्टचा सांगाडा तेवढा उभा आहे. जागोजागी फरशी उखडली असून इमारतीच्या जिन्यावरील भिंतीला लावलेली फरशीही निखळून पडली आहे. पहिल्या मजल्याच्या खिडक्या व भिंती गुटखा, पान खावून थुंकल्याने घाणीने बरबटल्याचे दिसून येत आहे. खिडक्यांची तावदानेही तुटली आहेत. दीड वर्षातच या इमारतीची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कैद्यांना व मनोरुग्णांना चांगल्या सुविधांसह उपचार मिळावेत, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले; परंतु या इमारतीमध्ये सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या कैदी व रुग्णांची हेळसांड होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा रुग्णालय प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात कैद्यांसह मनोरुग्णांची सुविधांअभावी हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:29 AM