नवी दिल्ली : गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील अंतिम लढतीनंतर सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू रणनीती व तंत्र एकमेकींना कळू नये म्हणून राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या वेगवेगळ्या अकादमींमध्ये सराव करीत आहेत.दोन्ही दिग्गज खेळाडू प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. गोपीचंद दोन्ही अकादमींमध्ये वेळ देत आहेत. हा घटनाक्रम गोल्डकोस्ट राष्ट्रकूल स्पर्धेनंतरचा आहे. त्यात सायनाने सिंधूचा पराभव करीत सुवर्णपदक जिंकले होते.सिंधूचे वडील पी.व्ही. रमन्ना यांनी सांगितले की,‘सिंधूला नव्या अकादमीमध्ये सराव करताना ठीक वाटत नव्हते. हा वैयक्तिक खेळ असल्यामुळे स्पर्धा राहीलच. त्यामुळे सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेनंतर जुन्याच अकादमीमध्ये सराव करण्याचा निर्णय घेतला.एकत्र सराव केला तर दोघींना एकमेकींच्या उणिवा, तंदुरुस्ती आणि रणनीतीबाबत माहिती होईल. त्यामुळेच सायनाने अकादमी सोडत विमलकुमार यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला होता आणि तीन वर्षांनंतर ती गोपीचंद अकादमीमध्ये परतली.’प्रशिक्षक गोपीचंद यांनीही एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली की, ‘गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकासाठी झालेल्या लढतीत सायनाने सिंधूला धक्का देत बाजी मारली होती. यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपल्यात चर्चा करुन एकत्रित प्रशिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोघांचा सराव वेगवेगळ्या ठिकाणी सुरु आहे. (वृत्तसंस्था)गोपीचंद यांची नवी अकदामी जुन्या अकादमीपासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. खेळाडू नव्या अकादमीमध्ये सराव करीत आहेत.रमन्ना म्हणाले,‘गोपी सकाळी ७ ते ८.३० पर्यंत तिच्याकडून सराव करवून घेतात आणि त्यानंतर ती दोन इंडोनेशियन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.’
वेगवेगळ्या अकादमीत सायना, सिंधूूचा सराव; व्यस्त कार्यक्रमापूर्वी जोरदार तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 11:37 PM