नवी दिल्ली : लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या महिलांची भूमिका प्रशंसनीय असल्याचे सांगून स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने बुधवारी ‘# मी टू’ मोहिमेला पाठिंबा दर्शविला.मोबाईल सेवा पुरविणाºया आघाडीच्या कंपन्यांद्वारे महिलांची सुरक्षा लक्षात घेऊन सुरु करण्यात आलेल्या नव्या सेवेच्या अनावरणप्रसंगी सिंधूने संवाद साधताना या मोहिमेचे समर्थन केले. सिंधू म्हणाली, ‘# मी टू’ या मोहिमेमुळे अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. त्यामुळे मला खरेच त्यांचे कौतुक वाटते. ज्या महिलांवर असा अन्याय झाला आहे अशा महिलांच्या पाठीशी मी कायम खंबीरपणे उभी असेन.’महिलांवरील अन्याय गेल्या अनेक काळापासून होत आहे. तरीही कोणतीही स्त्री याविषयी स्पष्टपणे व्यक्त होत नव्हती. मात्र ‘# मी टू’ मोहिमेअंतर्गत महिला बोलू लागल्या. त्यांच्यावरील अन्याय आज समोर येत आहे. माझा त्यांना पाठिंबा असेल. ज्या काही घटना समोर येत आहेत ते पाहून मला खूप मोठा धक्का बसला आहे. या घटनांवर लोक कसे विचार करतात, ते पाहून अधिक दु:ख होते. ‘#मी टू’मुळे बदलाचे वारे वाहू लागलेत. लैंगिक शोषण थांबलेच पाहिजे,’ असे रोखठोक मत सिंधूने व्यक्त केले.क्रीडा क्षेत्रातही अशा गोष्टी घडतात का, असा प्रश्न विचारताच पी. व्ही. सिंधू म्हणाली की, ‘मला अन्य लोकांबाबत माहिती नाही. पण माझ्याबाबत बोलायचे तर सुरुवातीपासून मला क्रीडा क्षेत्रात अशा गोष्टींचा त्रास झालेला नाही.’ (वृत्तसंस्था)
#MeToo : लैंगिक शोषणाविरुद्ध महिलांनी पुढे येणे प्रशंसनीय - पी.व्ही. सिंधू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 2:19 AM