ग्लास्गो, दि. 27 - रिओ ऑॅलिम्पिक रौप्य विजेती स्टार पी. व्ही. सिंधू हिने चीनच्या चेन युफेईवर मात करत विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
2013 आणि 2014 मध्ये कांस्य पदक जिंकणा-या 22 वर्षांच्या पी. व्ही. सिंधूने शनिवारी झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चीनच्या चेन युफेईवर 48 मिनिटांत 21-13, 21-10 अशा फरकाने विजय मिळवला. विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठणारी पी. व्ही. सिंधू पहिली भारतीय खेळाडू आहे. तर, उपात्यंपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधूने विश्व क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली चीनच्याच सून यू हिच्यावर सरळ गेममध्ये विजय नोंदवित कास्य पदक निश्चित केले होते. यावेळी सून यू हिच्यावर 39 मिनिटांत 21-14, 21-9 अशी मात करत पी.व्ही. सिंधूने उपांत्य फेरी गाठली होती.
आता अंतिम फेरीत पी. व्ही. सिंधू आणि जपानची नोजोमी ओकुहारा यांच्यात लढत होणार आहे. नोजोमी ओकुहारा हिने शनिवारी भारताची फुलराणी आणि लंडन ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे सायना नेहवाल हिला विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. यावेळी नोजोमीने 12-21, 21-17, 21-10 अशा सरळ सेटमध्ये सायना नेहवालचा पराभव केला.
दरम्यान, पी.व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांनी तिला ट्विटरच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.