नवी दिल्ली : आॅलिम्पिक रौप्य विजेती स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्या नावाची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सोमवारी देशातील तिस-या क्रमांकाच्या सर्वोच्च ‘पद्मभूषण’या नागरी पुरस्कारासाठी शिफारस केली.आम्ही सिंधूच्या नावाची शिफारस पद्मभूषणसाठी केली असल्याची माहिती क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने दिली. विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोनदा कांस्य आणि एकवेळा रौप्य तसेच मागच्यावर्षी रियो आॅलिम्पिकमध्ये रौप्य विजेत्या सिंधूने कधीही मागे वळून पाहिलेले नाही. हैदाराबादच्या या २२ वर्षांच्या कन्येने २०१६ च्या चायना ओपन सुपर सिरीज प्रीमियर, इंडियन ओपन सुपर सिरीज या स्पर्धांसोबतच मागच्या महिन्यात ग्लास्गो येथे विश्व चॅम्पियनशिपचे रौप्य जिंकले होते. याच महिन्यात कोरिया ओपन जिंकून सिंधूने तिसरे सुपरसिरीज जेतेपद पटकविले होते. सिंधूने यंदा लखनौ येथे सय्यद मोदी ग्रॅॅण्डप्रिक्स गोल्ड स्पर्धा जिंकली होती. याच जेतेपदाच्या बळावर सिंधू यंदा एप्रिल महिन्यात काहीवेळ सर्वोच्च दुसºया स्थानावर विराजमान झाली होती. त्यानंतर सेऊल येथे अप्रतिम कामगिरी करीत मागच्या आठवड्यातही क्रमवारीत दुसरे स्थान मिळविले होते.२०१४ च्या राष्टÑकूल क्रीडा स्पर्धा, इंचियोन आशियाड उबेर कप आणि आशियाई चॅम्पियनशिप या स्पर्धांमध्ये तिला कांस्य पदक मिळाले. मार्च २०१५ मध्ये देशाचा सर्वोच्च चौथा नागरी सन्मान ‘पद्मश्री’ने सिंधूचा गौरव करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)सिंधू म्हणाली,‘थँक यू...’‘पद्मभूषण’साठी शिफारस केल्याबद्दल पी. व्ही. सिंधूने क्रीडा मंत्रालयाचे आभार मानले आहेत. ‘मी खूश आहे. माझ्या नावाची शिफारस केल्याबद्दल क्रीडा मंत्रालयाचे आभार मानते,’ या शब्दात सिंधूने प्रतिक्रिया व्यक्त केली.सिंधूचे वडील अर्जुन पुरस्कारप्राप्त माजी व्हॉलिबॉलपटू पी. रामन्ना राव म्हणाले,‘ आम्ही आभारी आहोत, पण पुरस्काराची अधिकृत घोषणा होईपर्यंत प्रतीक्षाकरावी लागेल.रिओ आॅलिम्पिकचे रौप्य जिंकल्याबद्दल सिंधूच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
सिंधूची ‘पद्मभूषण’साठी शिफारस, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सुचविले नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:44 AM