पॅरिस : जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय स्टार किदाम्बी श्रीकांत तसेच रिओ आॅलिम्पिकची रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू यांनीफ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा सलामीचा अडथळा दूर करीत गुरुवारी दुसरी फेरी गाठली. श्रीकांतने मागच्या आठवड्यात डेन्मार्क ओपन सुपर सिरीजच्या जेतेपदासह या मोसमातील तिसरे विजेतेपद पटकावले होते.आज त्याचा प्रतिस्पर्धी खेळाडू जर्मनीचा फॅब्रियन रोथ पहिल्या गेममध्ये ०-३ ने माघारताच निवृत्त झाला. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतची गाठ आता हाँगकाँगचा व्होग व्हिन्सेंटविरुद्ध होईल. श्रीकांतने मागच्या आठवड्यात व्हिन्सेंटला नमविले आहे.सिंधूने या मोसमात दोन जेतेपदांसह विश्व चॅम्पियनशिपचे रौप्यदेखील जिंकले आहे. तिने स्पेनची बिट्रिज कोरालेस हिच्यावर २१-१९, २१-१८ ने विजय नोंदविला. तिची गाठ जपानची सयाका ताकाहाशी हिच्याविरुद्ध पडेल. सात्त्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या दुहेरी जोडीने पुरुष गटात अवघ्या ३० मिनिटांत फ्रान्सच्या बॅस्टियन केरसोडी-ज्युलियन माइयो डोडीचा २१-१२, २१-१४ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)
रिओ आॅलिम्पिकची रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू यांनी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:54 AM