नवी दिल्ली : ‘राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमुळे यंदाचे सत्र खेळाडूंसाठी अत्यंत व्यस्त आहे. यासाठी खेळाडूंची तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी प्रशिक्षक आणि फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.इंडिया ओपन स्पर्धेच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गोपीचंद यांनी म्हटले की, ‘व्यस्त कार्यक्रमाविषयी बोलण्यासाठी हा योग्य मंच नाही. खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रशिक्षकांचे काम खूप वाढले असून, ते कठीण बनले आहे. अव्वल खेळाडूंकडून खूप अपेक्षा असून त्यांच्यापुढे आव्हाने वाढली आहेत. त्यांना नव्या आव्हानांपुढे चांगले ताळमेळ साधावे लागेल.’ गोपीचंद यांनी पुढे म्हटले की, ‘किदाम्बी श्रीकांतने अनेक मोठ्या स्पर्धा होणार असून तंदुरुस्त राहावे लागेल असे सांगितले, तर अशा परिस्थितीमध्ये खेळाडूच्या खाण्यापिण्यासह त्याच्या सरावाचे वेळापत्रक ठरविण्यापर्यंत प्रशिक्षक व फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते.गेल्या काही काळापासून दुखापतींना सामोरे गेलेल्या श्रीकांतने या वेळी सांगितले की, ‘नोव्हेंबरमध्ये दुखापतग्रस्त झाल्याने मला चायना ओपनमधून माघार घ्यावी लागली. यामुळे मला सुपर सीरिज फायनल स्पर्धेपूर्वी सावरण्यासाठी वेळ मिळणार होता. सुपर सीरिजनंतर पीबीएल दरम्यानही मी दुखापतग्रस्त झालो आणि त्यामुळे इंडोनेशिया ओपन स्पर्धेत खेळू शकलो नाही.’ नुकताच झालेल्या इंडोनेशिया ओपन स्पर्धेत उपविजेती ठरलेल्या सायना नेहवालने व्यस्त कार्यक्रमाविषयी म्हटले की, ‘मी कोणत्याही विशिष्ट स्पर्धेमध्ये खेळण्याविषयी विचार केलेला नाही. प्रत्येक स्पर्धेविषयी मी उत्सुक असून माझे लक्ष तंदुरुस्त राहण्यावर केंद्रीत आहे.’ (वृत्तसंस्था)‘खेलो इंडिया’ शालेय क्रीडा योजना खूप चांगली संकल्पना आहे. देशात खेळांवर अधिक लक्ष दिले जात असल्याचे पाहून खूप चांगले वाटते.- पुल्लेला गोपीचंद
प्रशिक्षक व फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार - पुल्लेला गोपीचंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 1:36 AM