मॉस्को- भारताच्या सौरभ वर्माने यंदाच्या मौसमातील पहिल्या जेतेपदाला गवसणी घातली. त्याने जपानच्या कोकी वॅटनेबचा पराभव करून रशिया ओपन टूर सुपर १०० बॅडमिंटन (Russian Open Badminton 2018 ) स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने १८-२१, २१-१२, २१-१७ अशा फरकाने अंतिम लढत जिंकली. दुखापतीमुळे बराच काळ ग्रस्त असलेल्या सौरभने अंतिम लढतीत पिछाडीवर रून मुसंडी मारली. २०१६ मध्ये त्याने चायनीज तैपेई मास्टर्स स्पर्धा जिंकली होती आणि त्यानंतरचे त्याचे हे पहिलेच जेतेपद आहे.
उपांत्य फेरीत २५ वर्षांच्या सौरभने आपलाच सहकारी मिथुन मंजुनाथ याच्यावर २१-९, २१-१५ असा सरळ गेममध्ये विजय नोंदवला. मात्र अंतिम फेरीत त्याला विजयासाठी जपानच्या खेळाडूने झुंजवले. प्रथमच सौरभचा मुकाबला जपानच्या या खेळाडूशी झाला.
जागतिक क्रमवारीत ६५ व्या स्थानावर असलेल्या सौरभला पहिला गेम १८-२१ असा गमवावा लागला. या गेममध्ये गुणसंख्या १८-१८ अशी समसमान होती, परंतु जपानच्या खेळाडूने सलग तीन गुण घेत हा गेम घेतला. मात्र सौरभने दुसऱ्या गेममध्ये ११-६ अशी आघाडी घेतली आणि पुढे तिचे २१-१२ अशा विजयात रूपांतर केले. तिसऱ्या गेममध्ये सौरभ ६-११ अशा पिछाडीवर होता. पण त्याने निर्धाराने खेळ करताना १४-१४ अशी बरोबरी मिळवली. पुढील सहा गुणांमध्ये दोन्ही खेळाडूंनी समसमान खेळ केला. भारतीय खेळाडूने त्यानंतर सफाईने खेळ केला आणि हा गेम २१-१७ असा जिंकून जेतेपद नावावर केले.
याच स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदाची भर पडली. रोहन कपूर आणि कुहू गर्ग या जोडीने मिश्र दुहेरीचे रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत रशियाचा व्लादिमिर इव्हानोव्ह आणि कोरियाची मिन क्यूंग किमने भारतीय जोडिवर २१-१९,२१-१७ असा अवघ्या ३७ मिनिटांत विजय मिळवला.