हाँगकाँग: सायना नेहवाल आणि समीर वर्मा या भारतीय बॅडमिंटनपटूंचे आव्हान हाँगकाँग ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत संपुष्टात आलेले. बुधवारी आठव्या मानांकित सायनाला चीनच्या कै यान यान हिने १३-२१, २०-२२ अशा दोन गेममध्ये पराभूत केले. आठवी मानांकित सायना गेल्या सहा स्पर्धांमध्ये पाचवेळा पहिल्याच फेरीत पराभूत होऊन बाहेर पडली आहे.सायनाने चीनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा निभाव लागला नाही. दुसऱ्या गेममध्ये सायनाने विजयाच्या प्रयत्नांत बराच घाम गाळला पण तिचे प्रयत्न तोकडे पडले. पुरुषांमध्ये १६ वा मानांकित समीर वर्मा याचे आव्हान चायनीज तैपईच्या वँग त्झू वईने अवघ्या ५४ मिनिटात परतवून लावले. पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागण्याची समीरची ही तिसरी वेळ ठरली. समीर प्रतिस्पर्धी खेळाडूच्या आव्हानाचा सामना करु शकला नाही.दुसरीकडे गेल्या काही स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बाहेर झालेली जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावरील सिंधू ३६ मिनिटात विजयी झाली. जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानी असलेली कोरियाच्या किम गा यून हिच्यावर तिने २१-१५, २१-१६ असा विजय साजरा केला. सिंधूने पहिल्या गेममध्ये १३-१३ अशी बरोबरी झाल्यानंतर सलग सहा गुणांची कमाई करीत सहजपणे गेम जिंकला. दुसºया गेममध्ये सुरुवातीला ५-५ अशी बरोबरी होती, पण सलग सात गुणांची कमाई करीत सिंधूने आघाडी मिळविताच तिला गेम आणि सामना जिंकण्यात अडचण जाणवली नाही. आॅलिम्पिक रौप्य विजेत्या सिंधूला आता थायलंडची बुसानन ओंगबामरूनगफान हिच्याविरुद्ध खेळावे लागेल.पुरुष एकेरीमध्ये एच. एस. प्रणॉय हादेखील पहिला अडथळा पार करण्यात यशस्वी ठरला. त्याने चीनचा हुआंग यू शियांग याच्यावर ४४ मिनिटांच्या खेळात २१-१७, २१-१७ ने मात केली. अश्विनी पोनप्पा- एन. सिक्की रेड्डी यांची जोडी देखील पहिल्या फेरीत पराभूत झाली. त्यांना डेन्मार्कच्या मायकेन- सारा यांच्याकडून १३-२१, १२-२१ ने धक्का बसला. (वृत्तसंस्था)
सायना पुन्हा सलामीला पराभूत, समीरलाही धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 4:15 AM