वुहान : भारतीय स्टार शटलर सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी गुरुवारी आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचप्रमाणे, समीर वर्मा यानेदेखील पुरुष एकेरीत विजयी कूच केली आहे.लंडन आॅलिम्पिकची कांस्य विजेती सायनाने ३८ मिनिटांच्या खेळात कोरियाची किम यून हिच्यावर मातकेली. सायनाची पुढील फेरीत लढत तिसरी मानांकित जपानची अकाने यामागुची हिच्याविरुद्ध होईल. चौथी मानांकित सिंधूने ३३ मिनिटांत इंडोनेशियाची चोईरुन्निसा हिचा २१-१५,२१-१९ ने पराभव केला. सिंधूला आता बिगर मानांकित चीनच्या केइ यानयान हिच्याविरुद्ध खेळायचे आहे. दुसरीकडे, पुरुष एकेरीत समीर वर्मा याने हाँगकाँगचा यंग एंगस याच्यावर २१-१२, २१-१९ ने विजय नोंदविला. मिश्र दुहेरीत भारतीय जोडी उत्कर्ष अरोरा-करिष्मा वाडकर दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाची जोडी हफीज फैजल-ग्लोरिया इमान्युएल यांच्याकडून १०-२१, १५-२१ ने पराभूत झाली. व्यंकट गौरव प्रसाद आणि जुही देवांगण यांच्या जोडीलाही चीनची यिलयू वांग-डोगपिग हुआंग यांच्याकडून १०-२१, ९-२१ ने पराभवाचा धक्का बसला. (वृत्तसंस्था)
आशियाई बॅडमिंटन स्पर्धा सायना नेहवाल, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 2:59 AM