जकार्ता- सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या दोन आघाडीच्या बॅडमिंटनपटूमध्ये इंडोनेशियात जबरदस्त सामना रंगलाय. या सामन्यात सायना नेहवालनं इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधूचा पराभव केला. सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूवर 21-13, 21-19 अशी दोन सेटमध्ये मात केली आहे. सिंधूचा पराभव करत सायना नेहवालनं इंडोनेशिया मास्टर्स उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी चीनच्या चेन झियोझिनचा 21-12, 21-18 अशा दोन सेटमध्ये पराभव केला होता. तर सिंधूनं मलेशियाच्या गोह जिन वी एकाकी झुंज देत 21-12, 21 -9 असा पराभवाची धूळ चारली होती. सिंधू आणि सायना यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर दोनदा आमने-सामने आल्या होत्या. 2014मध्ये झालेल्या सय्यद मोदी ग्रांप्री स्पर्धेतही सिंधूला सायनाकडून पराभव पत्करावा लागला होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी बॅडमिंटन खेळाच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या पी. व्ही. सिंधूचा पराभव करत सायना नेहवालनं 82व्या सीनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा किताब पटकावला होता. अटीतटीच्या लढतीत सायनानं सिंधूचा 21-17, 27-25 असा पराभव केला.
सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स उपांत्य फेरीत केला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 4:24 PM