जकार्ता: माजी नंबर वन ‘फुलराणी’सायना नेहवाल हिने शुक्रवारी आॅलिम्पिक रौप्य विजेती पी. व्ही. सिंधूवर विजय नोंदवीत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
गुडघ्याच्या दुखापतीनंतर कोर्टवर आलेल्या सायनाने भारताच्या अव्वल दोन खेळाडूंमधील थरार सरळ गेममध्ये २१-१३,२१-१९ असा जिंकला. विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यविजेत्या सायनाला उपांत्य लढतीत थायलंडची चौथी मानांकित रतचानोक इंतानोन हिचे आव्हान असेल. आतापर्यंत उभय खेळाडूंदरम्यान झालेल्या १३ लढतींमध्ये सायनाचे पारडे जड ठरले. सायनाने आठ सामने जिंकले आहेत. रतचानोकने अन्य एका उपांत्यपूर्व लढतीत ग्लास्गो विश्व चॅम्पियनशिपची विजेती जपानची नोजोमी ओकुहारा हिला नमविले.
भारताबाहेर सिंधूविरुद्ध प्रथमच खेळणा-या सायनाने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला ३-० अशी आघाडी घेतल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. एकवेळ ११-६ आणि नंतर १८-१० अशा आघाडीसह २१-१३ ने विजय नोंदविला. सायनाला दुस-या गेममध्ये संघर्ष करावा लागला. सिंधू एकवेळ १०-५ ने पुढे होती. पण सायनाने सलग पाच गुण संपादन करीत १०-१० अशी बरोबरी साधली. त्यानंतर उभय खेळाडू १४-१४ असे बरोबरीत आले होते. सायनाने यानंतर आघाडी घेणे सुरू केले. जय-पराजयाचे पारडे दोन्हीकडे झुकत असताना अखेर सायनाने २१-१९ अशी बाजी मारली.आंतरराष्ट्रीय पातळीवर याआधी सायना-सिंधू दोनदा समोरासमोर आल्या होत्या. दोन्हीवेळा भारतातच सामने झाले. सय्यद मोदी ग्रॅण्डप्रिक्स स्पर्धेत २०१४ ला सायनाने सिंधूवर विजय नोंदविला होता. मागच्या वर्षी सिंधू इंडियन ओपन सुपर सिरिजमध्ये विजयी ठरताच, तिने सायनाविरुद्ध पराभवाची परतफेड केली. नागपुरात अलीकडेच झालेल्या सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना सिंधूवर वरचढ ठरली होती.